scorecardresearch

“भाजापाचेच २५ आमदार महाविकास आघाडीत येणार ; रावसाहेब दानवेंचा दावा म्हणजे…”

मंत्री अब्दुल सत्तारांनी साधला निशाणा ; एमआयएमच्या ऑफरबाबत देखील दिली आहे प्रतिक्रिया

“भाजापाचेच २५ आमदार महाविकास आघाडीत येणार ; रावसाहेब दानवेंचा दावा म्हणजे…”
(संग्रहीत छायाचित्र)

महाविकास आघाडीचे २५ आमदार राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, असा दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल धुळवडीच्या दिवशी केला होता. जशा निवडणुका लागतील तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केलं होतं. यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून प्रत्युत्तर दिलं जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील दानवेंवर निशाणा साधला आहे. शिवाय, एमआयएमकडून महाविकास आघाडीला देण्यात आलेल्या ऑफरबाबत देखील सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात दानवेंचा गौप्यस्फोट; म्हणाले “निवडणुका लागल्या की…”

“रावसाहेब दानवे बरोबर बोलले त्यांचे २५ आमदार हे गडबड करू लागेल, खरखर करू लागले ते भाजपाचे २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. धूळवड म्हणून भजे वैगरे खाऊन काहीतरी बोलण्याचा त्यांनी प्रयोग केला असेल, तर मला माहीत नाही. परंतु त्यांचे २५ आमदार फुटणार आहेत. तरी त्यांनी त्यांचे २५ आमदार सुरक्षित ठेवावेत, याबाबत शाश्वती त्यांनी दिली तरी धन्यवाद. भाजपाचे २५ आमदार महाविकास आघाडीत सहभागी होणार आहेत. हा धोका निर्माण होऊ नये म्हणून उलटा चोर कोतवाल को डाटे.” असं म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असणार –

तसेच, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली आहे. यावर बोलतान मंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांना सांगितले की, “या शिवसेनेत पक्षप्रमुख जो निर्णय घेतात तो निर्णय अंतिम असतो. राजेश टोपे यांनी काय म्हटलं ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. परंतु महाविकास आघाडीचे प्रमुख आमचे मुख्यमंत्री आहेत. इम्तियाज जलील असो किंवा त्यांचे अन्य कोणी पदाधिकारी, खासदार, आमदार, सदस्य यांच्याबाबतचा सर्व अंतिम निर्णय आमचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेऊ शकतात, हे मी आपल्याला शिवसेनेच्यावतीने बोलतोय. परंतु महाविकास आघाडीचे प्रमुख हे शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत, ते जे निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य असेल.”

आज (शनिवार) जालन्यात पंचायत समिती कार्यालयाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी शिवसेनेचे नेत अर्जुन खोतकर यांची देखील उपस्थिती होती. यावेळी सत्तार यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

“काल काय बोललो ते दानवेंना आठवणार नाही”; २५ आमदार संपर्कात असल्याच्या दाव्यावर राऊतांचा टोला

रावसाहेब दानवेंच्या विधानावर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, “लोक धुळवडीला भांग पितात अशी परंपरा आहे. पण रावसाहेब दानवे भांग पितात अशी माहिती माझ्याकडे नाही. रावसाहेब दानवे भांग पित नाहीत आणि ते दिल्लीत माझ्या बाजूलाच राहतात. त्यांना कुठलीही नशा करण्याची आवश्यकता पडलेली नाही. तरीपण ते असे धुळवडीला कोणत्या नशेमध्ये बोलले मला माहिती नाही. ते २५ बोलले आहेत पण त्यांना महाविकास आघाडीचे १७५ आमदार आमच्या संपर्कात आहे म्हणायचे असेल. त्यांची जीभ घसरली असेल. असे असेल तर मग आमदार घ्या आणि कोणासाठी थांबला आहात. तुमचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत असे म्हटले तर तुम्ही काय म्हणणार आहात?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2022 at 14:32 IST
ताज्या बातम्या