scorecardresearch

अबब! ‘रायगड भूषण’ पुरस्काराचे यंदा २५७ मानकरी ; निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुरस्काराची खैरात?

अलिबाग येथे उद्या होणार पुरस्कार वितरण 

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर डोळा ठेवून यंदा रायगड जिल्हा परीषद  ‘रायगड भूषण‘ पुरस्काराची खिरापत वाटप करत असल्याचे दिसून येत आहे. कारण, तब्‍बल २५७ जणांना यंदा ‘रायगड भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार वितरण उद्या ( दि. ६ मार्च) केले जाणार आहे.

   रायगड भूषण सारख्या मानाच्या पुरस्कारांचे निकष हा नेहमीच संशोधनाचा विषय राहिला आहे. आपल्या मर्जीतील लोकाना पुरस्कार देण्याची परंपरा पूर्वीपासून दिसून आलेली आहे.  दरवर्षी पुरस्कार मिळणाऱ्यांची यादी वाढतच आहे. रायगड भूषण हा  जिल्ह्यात प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार आहे . महाराष्‍ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्‍कार प्रदान करून सन्‍मानीत करण्‍यात आले होते. परंतु त्याची रया जिल्हा परिषदेने घालवली असल्याच मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.  यापूर्वीही सत्ताधारी रायगड भूषण पुरस्कारांची खिरापत वाटत असल्याचा आरोप झालेला आहे.  मात्र तरीही काहीच फरक पडलेला दिसत नाही, पुरस्कार प्राप्‍त व्‍यक्‍तींची नावे वाढतच आहेत. 

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा आघाडीवर राहिला तो येथील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींमुळे. अध्यात्मिक संप्रदायांचा जिल्हा म्हणून रायगड जिल्ह्याची जगभर ओळख निर्माण झाली आहे. अनेक व्यक्तींनी आपआपल्या क्षेत्रात काम करुन जिल्ह्याची सामाजिक स्थिती सुधारण्यास हातभार लावला आहे. अशा व्यक्तींची रायगड जिल्हा परिषदने रायगड भूषण पुरस्कारासाठी निवड करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे त्याची प्रतिष्ठा कमी होत असल्याचं बोललं जात आहे.

उद्या (रविवारी ६ मार्च) दुपारी २ वाजता अलिबाग येथील पीएनपी नाटयगृहात हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. पालकमंत्री आदिती तटकरे , खासदार सुनील तटकरे, शेकापचे आमदार जयंत पाटील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

निवडणुकांवर सत्ताधाऱ्यांचा डोळा? –

रायगड जिल्‍हयातील गुणवंतांचा योग्‍य सन्‍मान व्‍हावा, यासाठी हा पुरस्‍कार सुरू करण्‍यात आला. मात्र जिल्‍हा परीषदेतील सत्‍ताधारी त्‍याचा वापर राजकीय सोय म्‍हणूनच करत असल्‍याचे आजवर दिसून आले आहे. निवडणूका डोळयासमोर ठेवून ही खिरापत दरवर्षी वाटली जाते, असं बोलल्या जातं. लोकसभा निवडणूकीपूर्वी जिल्‍हयातील १५३ जणांना तर विधानसभा निवडणूकीपूर्वी १८७ जणांना रायगड भूषणचे वितरण करण्‍यात आले. अवघ्‍या तीन महिन्‍यात प्रसाद वाटावा तसे पावणेचारशे पुरस्‍कार वाटण्‍यात आले.   या संदर्भात माध्‍यमे, समाज माध्‍यमांवर जोरदार टीका झाली तरी सत्‍ताधारी आपल्‍या भूमिकेला चिकटून राहिले आहेत. आता जिल्‍हा परीषद आणि पंचायत समितीच्‍या निवडणूका तोंडावर आल्‍या आहेत. या पार्श्‍वभूमीवर कार्यकाल संपण्‍याआधी पुरस्‍कार वितरण केले जात असल्याचे दिसत आहे.

यासंदर्भात जिल्‍हा परीषदेच्‍या सामान्‍य प्रशासन विभागाचे उपमुख्‍यकार्यकारी निलेश घुले यांना विचारले असता हे मागील दोन वर्षांचे पुरस्‍कार असल्‍याने ही संख्‍या अधिक असल्‍याची त्यांनी सारवासारव केली. मात्र त्‍याबाबत अधिक बोलणे त्‍यांनी टाळले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 257 recipients of raigad bhushan award this year msr

ताज्या बातम्या