तेवीस वर्षांपूर्वी मदत म्हणून घेतलेल्या २०० रुपयांची परतफेड करण्यासाठी केनियाचा खासदार थेट औरंगाबादमधील काशिनाथ गवळी यांच्या घरी पोहोचला. इतक्या वर्षांनंतरही आपली आठवण ठेवलेल्या या व्यक्तीला दारात पाहून गवळी यांच्या भावना दाटून आल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिचर्ड टोंगी असे या केनियन खासदारांचे नाव असून ते तेथील न्यारीबारी चाचे मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. शिक्षणानिमित्त औरंगाबादमध्ये असताना आपल्याला मदत करणाऱ्या गवळी यांना भेटण्यासठी ते इथे आले होते. १९८५-८९ या काळात रिचर्ड हे औरंगाबादमधील एका कॉलेजमध्ये मॅनेजमेंट स्टडीजचे शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांनी काशिनाथ गवळी यांच्याकडून २०० रुपयांची मदत घेतली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे २०० रुपये परत न करताच रिचर्ड आपल्या मायदेशात परत गेले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जेव्हा गवळी यांना या जुन्या विद्यार्थ्याचा आणि सध्याच्या केनियाच्या खासदाराचा फोन आला. फोनवरुन त्याने आपण औरंगाबादेत तुम्हाला भेटण्यासाठी आलो असल्याचे सांगितले तेव्हा गवळींना दाटून आले, त्यांना आपल्या भावना शब्दांत व्यक्त करता येत नव्हत्या. त्यानंतर जेव्हा रिचर्ड यांना मी माझ्या समोर पाहिले तेव्हा माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, अशी भावना गवळी यांनी व्यक्त केली.

रिचर्ड टोंगी हे आपली पत्नी मिशेल टोंगी यांच्यासोबत औरंगाबादला आले होते. यावेळी मिशेल म्हणाल्या, आमच्यासाठी हा खूपच भावनिक प्रवास होता. गवळी यांची भेट घेतल्यानंतर पती रिचर्ड यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

रिचर्ड म्हणाले, जेव्हा तीस वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये असताना माझी हालाखीची परिस्थिती होती तेव्हा या (गवळी) कुटुंबाने मला मदत केली. त्यानंतर मी ठरवले की, एके दिवशी मी पुन्हा औरंगाबादला येऊन त्यांच्या उपकारांची परतफेड करेन. माझ्या पडत्या काळात मला मदत केल्याबद्दल मी गवळी यांचे आभार मानतो, असे रिचर्ड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

काशीनाथ गवळी आणि त्यांच्या मुलांवर देवाची कृपा राहो, ते माझ्यासाठी खूपच महत्वाचे आहेत. घरी आल्यानंतर मला हॉटेलमध्ये जेवायला नेण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, मी त्यांच्या घरातच जेवण करण्याला पसंती दिली, असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. दरम्यान, केनियाला परत जाताना त्यांनी गवळी यांना आपल्या देशाला भेटीचे निमंत्रणही दिले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 30 years later kenya mp returns to aurangabad to repay rs 200 debt aau
First published on: 11-07-2019 at 16:49 IST