नांदेड: यंदाच्या पावसाळ्यात मृग ते पुष्य या नक्षत्रांपर्यंत जिल्ह्यात जेमतेम ३९ टक्के (३४८ मि.मी.) नोंद करणार्‍या  पावसाने ‘मघा’ नक्षत्राच्या आरंभी आणि शेवटच्या पर्वात अक्षरशः धुमाकूळ घालत विक्रमांची नोंद केली. जिल्ह्यात आतापर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी ८८ वर गेली असून ‘मघा’ आणि ‘आश्लेषा’ या दोन नक्षत्रांमध्ये तब्बल ३९ टक्के पाऊस बरसला.

गणरायांच्या आगमनानंतर गुरुवार-शुक्रवार दरम्यान नांदेड शहर व परिसरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागांमध्ये वरुणाने जबरदस्त कहर केल्याचे बघायला मिळाले. या दरम्यान जिल्ह्यातील तब्बल ६९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे आधीच विस्कळीत झालेल्या जनजीवनाचा एका रात्रीतूनच बोर्‍या वाजला. ‘जिकडे-तिकडे पाणीच, पाणी चोहीकडे’ असे शुक्रवारच्या सकाळच्या एकंदर दृश्य होते.

पावसाळ्यातील नक्षत्रांपैकी ‘मघा’ नक्षत्र हे जोरदार पर्जन्यमानासाठी पूर्वापार ओळखले जाते. यंदा जिल्हावासीयांनी या नक्षत्रातील पावसाचा विध्वंस आरंभी आणि शेवटी अनुभवला. १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी ‘आश्लेषा’ नक्षत्र संपले. तत्पूर्वी जिल्ह्यात ३९ टक्के पाऊस झाला होता. १४-१५ ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील २७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पावसाची टक्केवारी ५०च्या पुढे सरकली होती. तोपर्यंत जिल्ह्यातील पीक-पाणी चित्र चांगले, समाधानकारक आणि आश्वासक मानले जात होते.

१६ ऑगस्टपासून ‘मघा’ नक्षत्र सुरू होण्यापूर्वी हवामान खात्याने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिलेला होताच, त्याचा दारुण प्रत्यय पुढील चार दिवसांत बघायला मिळाला. १६ ऑगस्ट रोजी ५४ टक्के (४८५ मि.मी.) पाऊस नोंद झाली होती. ती १९ ऑगस्टपर्यंत ६७ टक्क्यांवर गेली. या काळात मुखेड तालुक्याच्या काही भागांत तर ‘मघा’ने ‘माझा विध्वंस बघा’, असे क्रूर दर्शन घडविले.

२० ते २६ ऑगस्ट दरम्यान पावसाने विश्रांती घेतली. वरील कालावधीत पालकमंत्री अतुल सावे आणि इतर नेत्यांनी मुखेडच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. २७ तारखेनंतर ‘मघा’चे रौद्ररूप जिल्ह्याच्या बहुतांश भागाने अनुभवले. २८ तारखेला ७३ टक्क्यांवर असलेला पाऊस ‘मघा’च्या अखेरच्या दिवशी ८८ टक्क्यांवर गेला. अवघ्या २४ तासांत पावसाची टक्केवारी १५ने वाढली. याच कालावधीत ६९ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी हा यंदाच्या पावसाळ्यातील एक विक्रम ठरला.

वरील नक्षत्र सुरू झाले तेव्हा जिल्ह्यात सरासरी ४८५ मि.मी. पाऊस झाला होता. तो आता ७८७ मि.मी. वर गेला आहे. पंधरवड्यातच जिल्ह्यामध्ये ३०२ मि.मी. पाऊस बरसला. जिल्हा प्रशासनासह सर्व संबंधित यंत्रणांवर आपत्ती निवारणाचे मोठे ओझे टाकत ‘मघा’नक्षत्राने निरोप घेतला आहे. शनिवारपासून ‘पूर्वा’ नक्षत्र सुरू होईल.

जिल्ह्यातील अतिवृष्टी (तारीखनिहाय)

१० जून-९ महसूल मंडळं, २६ जून-३९ मंडळ, २४ जुलै-४ मंडळं, २७ जुलै-१७ मंडळं, ८ ऑगस्ट-५ मंडळं, १५ ऑगस्ट-२७ मंडळं, १६ ऑगस्ट-४ मंडळं, १७ ऑगस्ट-२४ मंडळं, १८ ऑगस्ट-८ मंडळं, १९ ऑगस्ट-९ मंडळं, २८ ऑगस्ट-१७ मंडळं आणि २९ ऑगस्ट-६९ मंडळं. यंदा आषाढ महिन्यात पावसाने बरीच ओढ दिली होती; पण श्रावण आणि आताच्या भाद्रपदमध्ये जिल्ह्याने पावसाचा कहर अनुभवला.