अलिबाग- रायगड जिल्ह्यात तळा मांदाड रस्त्यावर झालेल्या अपघातात ४ जण ठार तर १५ जण जखमी झाले. भरधाव आलेल्या डंपरने एसटीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. जखमी मधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

तळा तालुक्यातील तळा नगरपंचायत हद्दीतील तारणे येथील एका धोकादायक वळणावर भीषण अपघात झाला आहे. रहाटाड येथून तळा येथे बस येत होती. तर डंपर तळाकडून मांदाड कडे जात होता. भरधाव वेगाने आलेल्या डंपरने तीव्र वळणावर एसटीला जोरदार धडक झाली. यात एसटी बसचा एक बाजूचा पत्रा कापला गेला.

अपघातानंतर डंपर पुढे जाऊन कलंडला.  या भीषण दुर्घटनेत बसमधील तृप्ती खुटीकर, लक्ष्मण ढेबे, अनन्या गवाणे, विठ्ठल कजबजे या चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने तळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.