जिल्ह्य़ातील ४१ व संयुक्त ३ वाळूपट्टय़ांचे लिलाव उद्या (बुधवारी) सुरू होणार आहेत. जिल्ह्य़ात दुष्काळी स्थिती असली, तरी वाळूपट्टय़ाचा लिलाव करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्य़ातील ४१ वाळूपट्टय़ांतून ६९ ब्रास वाळूउपसा करण्यास परवानगी मिळाली असून, यातून ८ कोटी ८० लाख रुपये मिळतील तर उर्वरित बीड व औरंगाबाद या दोन जिल्ह्य़ांच्या संयुक्त वाळूपट्टय़ाची किंमत २३ कोटी रुपये एवढी असेल. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.
वाळूपट्टय़ाच्या लिलावानंतर वाळूउपसा करणाऱ्या ठेकेदारांवरही मोबाईलच्या माध्यमातून आता लक्ष ठेवले जाणार आहे. ठेकेदारांना त्यांचे तीन मोबाईल क्रमांक प्रशासनाकडे द्यावे लागणार आहेत. त्या मोबाईल क्रमांकावरच वाळूउपसा करण्याचे टोकन दिले जाणार आहे. या साठी राज्यस्तरावर स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेचा लाभ होतो की नाही, हे थोडय़ाच दिवसात समजेल. बारकोडनुसार पावत्या दिल्यानंतर अनधिकृत उपसा होणार नाही, असा दावा केला जात होता. मात्र, पावत्यांवरील मजकूर पुसण्यासाठी मेणबत्तीचे प्रयोग करून ठेकेदारांनी ईप्सित साध्य केले. या पाश्र्वभूमीवर नव्या यंत्रणेत वाळूउपशाचे काय होते, याकडे प्रशासनही बारकाईने लक्ष ठेवून आहे. ज्यांनी ऑनलाईन प्रक्रियेत नाव नोंदविलेले नसेल, त्यांनाही लिलाव प्रक्रियेत भाग घेता येईल, असेही सूत्रांनी सांगितले.