कोणताही परवाना नसताना अवैधरीत्या तलवार, सुरा यासारख्या घातक शस्त्रांची विक्री करणाऱ्या तीन दुकानांवर पोलिसांनी छापा टाकून सुमारे साडेचारशे तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नांदेडच्या गुरुद्वारा परिसरात असलेल्या काही दुकानांवर अवैधरीत्या तलवार, सुरा, रामपुरी चाकू यांसारख्या घातक शस्त्रांची विक्री होते. इतवारा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी अबचलनगर परिसरात एका घरात छापा टाकून सुमारे चारशे तलवारी जप्त केल्या. त्यानंतर शुक्रवारी पोलीस अधीक्षक परमजितसिंग दहिया यांच्या आदेशाने काही दुकानांची झडती घेण्यात आली. पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे, वजिराबादचे निरीक्षक सतीश टाक, सहायक निरीक्षक नितीन कंडारे, अनिता चव्हाण, नाना िलगे, रामदास श्रीमगले, पांडुरंग जिनेवाड, स. राजदीपसिंग, अर्जुन मुंडे, बसवेश्वर मंगनाळे यांच्यासह सुमारे १००जणांचा फौजफाटा गुरुद्वारा परिसरात पोहोचला.
अनेक दुकानांची तपासणी केल्यानंतर तीन दुकानांतून तब्बल साडेचारशे तलवारी जप्त करण्यात आल्या. पोलिसांच्या या कारवाईने एकच खळबळ उडाली. या प्रकरणात मनजितसिंग छाबडा (४२), खेमसिंग बुंगई (७१) व वीरेंद्रसिंग महाजन या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर पोलीस प्रशासनाने वेगवेगळय़ा उपाययोजना सुरू केल्या आहेत. नाकाबंदी, झाडाझडती, प्रतिबंधात्मक कारवाई, सार्वजनिक ठिकाणी तपासणी केली जात आहे. ही कारवाई सुरूच राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.