मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या ५० जोडप्यांचे सामूहिक विवाह
दुष्काळी स्थितीत मदत म्हणून सुरू केलेल्या जनावरांच्या छावणीत गुरांबरोबर शेतकरीही मोठय़ा संख्येने राहत असल्याने सुरुवातीला छावणी चालकांनी कीर्तनाचे कार्यक्रम घेतले. याच छावणीत आता शेतकऱ्यांच्या उपवर मुला-मुलींच्या लग्नाचे मंगल सूर घुमणार आहेत. पालवण येथील छावणीत ५०पेक्षा जास्त सामुदायिक विवाह रविवारी (दि. १७) होणार असून या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार असल्याने छावणीत लगीनघाई सुरू आहे.
पालवण येथे आमदार विनायक मेटे यांचे कट्टर समर्थक शिवसंग्राम युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी छावणी सुरू केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या छावणीचे उद्घाटन झाले.
छावणीत हजारो जनावरे आश्रयाला असून त्यांच्याबरोबर पशुपालकही छावणीच्या आश्रयाला आहेत. त्यामुळे छावणीचालक मस्के यांनी शेतकऱ्यांना मोफत भोजनाची व्यवस्था दिली, तर छावणीतच गणेशोत्सव, पोळा सणही साजरे झाले. सरकारी अनुदानावरच्या छावण्या कशा यशस्वीपणे चालवाव्यात याचा उत्तम वस्तुपाठ छावण्यांतून पुढे आला आहे. आता शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या सामुदायिक विवाहाचेही सूर छावणीत वाजणार आहेत.

सेना-भाजपकडून सामूहिक विवाह सोहळे
औरंगाबाद : येते दोन दिवस सत्ताधारी मंडळीसाठी धामधुमीचे असतील. कारण मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शिवसेना व भाजपच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेकडून २४४, तर भाजपच्या वतीने ५०० जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने उद्या (शनिवारी) २४४ जोडप्यांच्या सामूहिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १२ वाजून ४५ मिनिटांनी होणाऱ्या या कार्यक्रमास राज्यपाल विद्यासागर राव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असेल. रेल्वे स्टेशन रस्त्यावरील अयोध्यानगरी मदानावर हा सोहळा होणार आहे.