सांगली : सांगलीसाठी ४४२ कोटींच्या ५०० खाटांच्या रुग्णालय उभारणीच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता देण्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्याचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडून ५०० खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले होते. तो प्रस्ताव २३३ कोटींचा होता, आता तो ४४२ कोटींचा झाला आहे. त्याचा सुधारित प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर असून, त्याला लवकर मान्यता मिळावी, अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे करण्यात आली. त्याला नवीन प्रशासकीय मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
रुग्णालयातील अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. यासाठी निधीची गरज आहे. एमआरआय मशीन आणि दोन सोनोग्राफी मशीनची अत्यंत गरज आहे, त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतींची डागडुजी करावी. २०२१ मध्ये विद्युत विभागाचे परीक्षण झाले असून, त्यावर प्रत्यक्ष काम करायला हवे. पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे डॉक्टर व वर्ग चारची रिक्त पदे भरावीत, अशीही मागणी चर्चेदरम्यान करण्यात आली.