सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गोवंशीय जनावरे अर्थात गुरांमध्ये लम्पी हा साथीचा आजार फैलावत आहे. त्याने आतापर्यंत ५७ जनावरे दगावली आहेत, तर ४४१ जनावरांना लम्पी आजाराचा विळखा पडला आहे. त्याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. लम्पी आजाराची साथ प्रामुख्याने त्वचेशी संबंधित असते. सर्वाधिक फैलाव माळशिरस तालुक्यात असून, तेथे एकूण ७१० जनावरांना या आजाराची लागण झाली होती. त्यांपैकी सध्या ५८७ जनावरे आजारमुक्त झाली आहेत. मात्र, १३ जनावरे दगावली असून, ११० जनावरे अजूनही आजारी आहेत.

करमाळा तालुक्यातील १८४ जनावरे आजाराने संशयित होती. त्यांपैकी १४३ जनावरे आजारमुक्त झाली. १० जनावरे मृत्युमुखी पडली असून, अद्यापि ३१ जनावरे आजाराने ग्रस्त आहेत. मंगळवेढा तालुक्यातील आजारी १६१ जनावरांपैकी ७ दगावली आहेत. ९१ जनावरांनी आजारावर मात केली आहे, तर ६१ जनावरे अद्यापि आजाराने ग्रस्त आहेत. माढा तालुक्यात ४३ जनावरांना या आजाराचा संशय होता. त्यांपैकी ९ जनावरे आजारमुक्त झाली आहेत. तर अद्यापि ३२ जनावरे या आजाराने सक्रिय आहेत. तर दोन जनावरे दगावली आहेत.

पंढरपूर तालुक्यातील ४८३ जनावरे संशयित आजारी म्हणून मोजण्यात आली होती. त्यांपैकी ३८९ जनावरे आजारातून बरी झाली आहेत. ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ८३ जनावरे अद्यापि लम्पी आजाराने ग्रस्त आहेत. सांगोला तालुक्यात ११५ पैकी ७७ जनावरांना लम्पी आजार जडला आहे, तर तीन जनावरे दगावली आहेत. अक्कलकोट तालुक्यात ८३ पैकी ६२ जनावरे रोगमुक्त झाली असून, अद्यापि २७ जनावरांना आजाराची लागण आहे. तर चार जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. करमाळा तालुक्यात १८४ जनावरे संशयित होती. १४३ जनावरे रोगमुक्त झाली आहेत.

दहा जनावरे दगावली आहेत, तर ३१ जनावरे बाधित आहेत. बार्शी तालुक्यातील अवघ्या एका जनावराला लम्पीने ग्रासले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यात ३४ पैकी २६ जनावरांनी आजारावर मात केली आहे; तर ६ जनावरे अद्यापि या आजारांशी झुंजत आहेत. दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात ११५ पैकी ९५ जनावरे रोगमुक्त झाली आहेत. चार जनावरे दगावली आहेत. १६ जनावरे या आजाराशी सक्रिय दिसून येतात.

या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, की माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यात लम्पी आजारबाधित जनावरांचे प्रमाण जास्त होते. परंतु मागील काही दिवसांपासून संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे साथीच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी सर्व पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. त्याचबरोबर जनावरांची आणि गोठ्याची स्वच्छताही ठेवावी. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे.