शहरातील राजीव गांधी चौक ते गरुडचौक या रस्त्याच्या दुभाजकात बागबगीचा करण्यासाठी आमदार अमित देशमुख व माजी खासदार जयवंत आवळे यांच्या निधीतून ५८ लाख रुपये खर्च करण्यात आले. २०१२ ते २०१४ दरम्यान हा खर्च झाला. ही झाडे जगविण्यासाठी २७ दिवसांत १ हजार ४४४ टँकर पाण्यासाठी ७ लाख २२ हजार रुपये खर्ची पडले. मात्र, ‘बिनझाडांचा बगीचा’ अशी या दुभाजकाची अवस्था आहे.
तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते रस्त्यातील दुभाजकात झाडे लावण्याचा प्रारंभ केला होता. दोन टप्प्यांतील कामे ८ डिसेंबर २०१२ रोजी पूर्ण झाली. २४ जानेवारी २०१४ ला महापालिकेकडे ती वर्ग केली. उर्वरित ५ कामे १६ मे २०१४ रोजी पूर्ण होऊन ६ सप्टेंबर २०१४ ला महापालिकेकडे वर्ग झाली. ही सर्व कामे मजूर संस्थांमार्फत केली. नाव मजूर संस्थेचे असले, तरी प्रत्यक्ष काम एकाच माणसाने केल्याचा आरोप मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी केला. मजूर संस्थांनी केलेल्या कामाची सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
एकाच दिवसात मजूर संस्थेला काम देताना सर्व नियम धाब्यावर बसवून काम देण्यात आले. त्यासाठी तत्परतेने कागद हलवले गेले. महापालिकेने विठ्ठलबाबा मजूर सहकारी संस्थेस बाभळगाव चौक ते सारोळा चौक या मार्गात लावलेल्या झाडांची देखभाल दुरुस्ती करण्यास एका वर्षांसाठी ९ लाख ८५ हजार ५०० रुपयांचे कंत्राट दिले. सारोळा चौक ते नांदेडनाका भागात रस्ता दुभाजकात लावलेली झाडे आपल्या विभागामार्फत लावली नसल्याचे बांधकाम विभागाने म्हटले आहे. मनपाकडे हे काम वर्ग झाले नसताना महापालिकेने देखभाल कंत्राट दिले कसे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
मोहिते वॉटर सव्र्हीसेस यांना झाडाला पाणी घालण्याचे काम दिले. गेल्या वर्षी २० मे ते ८ जून दरम्यान १८ दिवस व ९ ते १८ जून हे ९ दिवस अशा २७ दिवसांत दोन टँकरमार्फत १ हजार ४४४ टँकर पाणी घातल्याचे सांगून प्रत्येक टँकरमागे ५०० रुपयांप्रमाणे ७ लाख ३३ हजार बिल उचलण्यात आले. २७ दिवसांत एका टँकरच्या ७२२ खेपा होतात. सलग १२ तास काम केले, तरी अध्र्या तासाला एक खेप होते. टँकर भरणे व झाडाला पाणी घालत रिकामा करणे, यास किमान २ तास लागतात. वर्षभराच्या देखभालीसाठी केवळ २७ दिवस पाणी टाकल्याचे दाखवून लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. जनतेच्या पशाची कशी खुलेआम उधळपट्टी होते आहे, याचा हा पुरावा आहे.
गुणवत्तेची जबाबदारी अधिकाऱ्यांची – आ. देशमुख
नियमानुसार कागदाची पूर्तता करून घेणे व त्यानंतर योग्य काम होते आहे की नाही? हे पाहणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. बगीचाची दुरवस्था झाली असल्यास ती पुन्हा दुरुस्त करून घेण्याची जबाबदारीही अधिकाऱ्यांचीच असल्याचे आमदार अमित देशमुख म्हणाले.
.. तर चौकशी करू – आयुक्त तेलंग
दुभाजकातील झाडांची देखभाल, दुरुस्ती कामात काही गरप्रकार झाले असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले.
‘आम्ही झाडे लावली नाहीत’ – सा. बां. उपविभाग
सारोळा चौक ते नांदेडनाका रस्त्यावरील दुभाजकांत झाडे लावणे, तसेच बागबगीचा विकसित करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत केले नसल्याचे माहिती अधिकारात मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onलातूरLatur
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 58 lakhs for divider garden
First published on: 04-07-2015 at 01:30 IST