सोलापूर : एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत चालू २०२५-२६ आर्थिक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी ६ कोटी ८७ लाख ८६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या योजनेतून ड्रॅगन फ्रूटसह स्ट्रॉबेरी, हरितगृह, मसाला पीक, मधुमक्षिका पालन, फुलांची बाग तसेच शेततळे, सामूहिक शेततळे, अस्तरीकरण, औषधी आणि सुगंधी वनस्पती, प्लास्टिक मल्चिंग आदींचा समावेश आहे.

ही योजना खुल्या गटातील शेतकऱ्यांसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वर्गातील शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. ही माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालकीची शेतजमीन असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांकडे फळे, भाजीपाला, फुले व इतर स्वरूपात फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. या योजनेतून रोपवाटिका, आठ अश्वशक्तीपेक्षा क्षमतेचे ट्रॅक्टर पॉवर टिलर, फॉर्म गेट बॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, शीतसाखळी, कांदा चाळ आदींसाठी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.