​सावंतवाडी : महसूल यंत्रणा स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करणार नाही, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. स्वातंत्र्य दिनी महसूल विभागाशी संबंधित ६० ते ७० आंदोलने होणार असून, त्याबाबत आढावा घेऊन वस्तुस्थिती तपासली जाईल, असेही त्यांनी सांगितले. फळझाडांची ई-पीक नोंदणी दर तीन वर्षांनी व्हायला हवी, असे प्राथमिक चौकशीत समोर आले असून, याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे स्वातंत्र्य दिनी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागितला आहे. याबाबत नक्कीच आढावा घेतला जाईल असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

​सिंधुदुर्गनगरी येथील नियोजन मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर आदी उपस्थित होते.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमीन दलालांच्या दबावामुळे महसूल यंत्रणा स्थानिकांवर अन्याय करत असल्याच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी सांगितले की, “मी याबाबत माहिती घेत आहे. महसूल यंत्रणा कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही. मात्र स्वातंत्र्य दिनी होणाऱ्या आंदोलनांमध्ये महसूल विभागाशी संबंधित आंदोलनांची संख्या मोठी आहे. याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून पुढील कार्यवाही करणार आहे.”

जमिनी मोजणीची प्रक्रिया जलद करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने दहा खाजगी सर्वेअर नेमण्यात येणार आहेत. मात्र, या सर्वेक्षणाला भूमी अभिलेख अधिकाऱ्याची सही असल्यावरच ते वैध मानले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

​आंबोली, चौकुळ आणि गेळे येथील कबुलायतदार गावकर जमिनीच्या प्रश्नावर मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. ही बैठक मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांसोबत घेण्यात येईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.

बावनकुळे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५० वाळू माफिया आहेत. त्यांच्याशी महसूल विभागाचे साटेलोटे असल्याचे उघडकीस आले तर कारवाई करण्यात येईल. मात्र वाळू माफिया वर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी मिळून कारवाई करावी. तारकर्ली येथे काही जणांनी मला वाळू माफिया अंमली पदार्थ तरुणांना देत असल्याचे मला सांगण्यात आले,ही बाब गंभीर आहे. अशा वाळू माफिया वर कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.

सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यातील काही महसूल विभागाच्या प्रश्नांवर बैठका घेऊन निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. ते म्हणाले, आंबोली सारखं थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्र राज्यात सापडणार नाही. एवढे सुंदर पर्यटन स्थळ आहे. आंबोली, तारकर्ली व उभा दांडा या ठिकाणी मी दोन दिवस होतो. सिंधुदुर्ग सुंदर पर्यटन स्थळ आहे.आता ते विकासित करताना महसूल विषयक येणाऱ्या अडचणी मी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.