करोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून करोनाविषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. आज सी. एस. आय. आर. आय जी आय बी प्रयोगशाळेने आणखी २० डेल्टा प्लस रुग्ण शोधले. त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ झाली आहे. नव्याने आढळलेले २० रुग्ण हे मुंबई ७, पुणे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे.

राज्यात ८० टक्क्याहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असल्याचे दिसून येते आहे. या सर्वेक्षणातून राज्यात आतापर्यंत ६५ डेल्टा प्लस व्हेरीयंटचे रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत राज्यात आढळलेल्या ६५ डेल्टा प्लस रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३३ स्त्रिया आहेत. सर्वाधिक ३३ डेल्टा प्लस रुग्ण १९ वर्षे ते ४५ वर्षे वयोगटातील आहेत. तर त्या खालोखाल ४६ ते ६० वर्षे वयोगटातील १७ रुग्ण आहेत. यामध्ये १८ वर्षांखालील ७ रुग्ण असून ६० वर्षांवरील ८ रुग्ण आहेत.

६५ रुग्णांपैकी ज्या रुग्णांची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील एक मृत्यू वगळता डेल्टा प्लस रुग्णांमधील आजाराचे स्वरुप सौम्य ते मध्यम स्वरुपाचे आहे. विषाणूने आपली जनुकीय रचना बदलत राहणे, हा विषाणूच्या नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग असून या संदर्भात जनतेने कोणतीही भिती न बाळगता कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करणे गरजेचे आहे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.