कराड : अनंत चतुर्दशीला येथील कृष्णा घाटावर गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी येणाऱ्या हजारो गणभक्तांना श्रमपरिहार देण्याची परंपरा सलग अकराव्या वर्षी शिवसेना नेते रणजितनाना पाटील यांनी जोपासली आहे. यावर्षीच्या श्रमपरिहाराचा तब्बल ६५ हजार गणेश भाविकांनी लाभ घेतला आहे. रणजितनाना पाटील मित्र परिवारातर्फे यावर्षीही श्रमपरिहारासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.
सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. सकाळी घरगुती गणपती विसर्जनासाठी येणाऱ्या हजारो जणांनी सहकुटुंब श्रमपरिहाराचा आनंद घेतला. हा महाप्रसाद पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होता. सुमारे १८ तास भाविकांना अखंड अन्नसेवा देण्याचे कार्य रणजितनाना मित्रपरिवाराने यशस्वीपणे पार पाडले.
सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, माजी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्यासह आजी – माजी नगरसेवक, स्थानिक नेते, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त आदींनी या महाप्रसाद वाटपाच्या ठिकाणी भेट देऊन महाप्रसाद वाटपही केले. रणजितनाना पाटील व सचिन पाटील यांनी या सर्वांचे स्वागत केले.
भाविकांना पाण्याची बाटलीही देण्यात येत होती. रात्री १२ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाद्य बंद झाल्यानंतर महाप्रसाद वाटप केंद्रावर प्रचंड गर्दी झाली होती. गणेश विसर्जन मिरवणूक रात्री अडीच वाजता पार पडली. यानंतरही पहाटे चार वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप सुरूच होते. यावर्षी रणजितनाना पाटील यांनी श्रमपरिहाराच्या ठिकाणी विसर्जनाला येणाऱ्या मंडळांचे स्वागत करण्याचा महत्त्वाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा श्रीफळ आणि कराडची ग्रामदेवता श्री उत्तरालक्ष्मी देवीची प्रतिमा देऊन सत्कार केला. या उपक्रमाचे सर्वच मंडळांच्या अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कौतुक केले आहे.
पोलिसांनाही फूड पॅकेटची खास व्यवस्था
अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्तातील पोलीस तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना श्रमपरिहाराचे पॅकेट पोच करण्यात आले आहेत. अनेक नागरिकांनी फूड पॅकेट सोबत नेले आहेत. सुमारे ३५ हजार पॅकेट आणि ३० हजार भाविकांनी प्रत्यक्ष श्रमपरिवाराचा लाभ घेतल्याचे रणजितनाना पाटील व सचिन पाटील यांनी सांगितले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीतील गणेशभक्त व समस्त कराडकर नागरिकांना विनामूल्य महाप्रसाद वाटप केंद्राला अधिकाऱ्यांचीही भेट आवर्जून राहिली आहे. कराडचे विभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटणचे विभागीय तथा प्रांताधिकारी सोपान टोम्पे, कराडच्या तहसीलदार कल्पना ढवळे, कराड विभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर आदींनी श्रमपरिहारच्या ठिकाणी भेट दिली. त्यांचा रणजितनाना पाटील व सचिन पाटील यांनी सत्कार केला आहे.