नागपूर : राज्यात १ जून ते १ जुलै २०२२ दरम्यान करोनाचे ६९ मृत्यू झाले. त्यापैकी २९ मृत्यू हे गेल्या सात दिवसांतील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम अहवालानुसार, राज्यात १ जून ते १ जुलै २०२२ या एका महिन्यामध्ये करोनाचे ९८ हजार १९६ नवीन रुग्ण आढळले. त्यातील ६९ रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यूचे प्रमाण ०.०७ टक्के होते.

दरम्यान, राज्यात २५ जून ते १ जुलै दरम्यान सात दिवसांत २३ हजार १९० नवीन रुग्ण आढळले. त्यातील २९ रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यूचे प्रमाण ०.१२ टक्के होते. त्यामुळे गेल्या सात दिवसांत करोनाच्या मृत्यूचे प्रमाण काहीसे वाढलेले दिसत आहे. 

राज्यात मार्च २०२० पासून १ जुलै २०२२ पर्यंत करोनाचे ७९ लाख ७९ हजार ३६३ रुग्ण आढळले. त्यातील १ लाख ४७ हजार ९२९ रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यूचे प्रमाण १.८५ टक्के आहे. या तारखेपर्यंत राज्यांत ७८ लाख ७ हजार ४३८ व्यक्ती करोनामुक्त झाले. करोनामुक्तांचे प्रमाण ९७.८५ टक्के आहे.

सक्रिय रुग्णांची स्थिती

राज्यात १ जूनला ४ हजार ३२ सक्रिय रुग्ण होते. २५ जूनला ही संख्या वाढून २४ हजार ३३३ वर पोहचली. १ जुलै रोजी मात्र रुग्णसंख्या २३ हजार ९९६ एवढी नोंदवली गेली.