लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर मतदारसंघामध्ये ६९.८० टक्के, तर हातकणंगले मतदारसंघामध्ये ७०.९० टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजाराम माने यांनी गुरूवारी सायंकाळी पत्रकारांना दिली. गतवेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा ५ टक्क्य़ांहून अधिक मतदारांनी मतदान केल्याचे आज दिसून आले. दरम्यान, धनंजय महाडिक या उमेदवाराच्या छायाचित्राची व्होटर स्लिप मतदान केंद्रात नेल्याबद्दल बिनमहंमद गफार शेख या व्यक्तीवर शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    
कोल्हापूर व हातकणंगले या दोंन्ही मतदारसंघात अत्यंत चुरशीने होत असलेल्या लढतीचा प्रत्यय गुरूवारी मतदानाच्या वेगातून दिसून आला. कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात अतिशय चुरशीने निवडणूक होत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच येथे पाहायला मिळाली. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक व शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात खरा संघर्ष असून शेकापचे संपतराव पवार, लाल निशाणचे अतुल दिघे व आम आदमी पक्षाचे जिल्हा समन्वयक नारायण पोवार यांच्यासारखे प्रमुख उमेदवारही नशीब आजमावित आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्य़ातील चार व सांगली जिल्ह्य़ातील दोन अशा सहा तालुक्यांच्या मिळून बनलेल्या हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे या आजी-माजी खासदारांमध्ये कडवा संघर्ष रंगला आहे. आप कडून शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील व मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यासारखे अन्य काही प्रमुख उमेदवारही या आखाडय़ात उतरले आहेत. गेले महिनाभर सर्व पक्षांकडून प्रचाराची राळ उठल्याने मतदारांत चांगल्या प्रकारे जागृती झाल्याने नागरिकांच्यात मतदान करण्याकडे कल दिसत होता. त्याचा प्रत्यय गुरुवारी सकाळपासूनच येऊ लागला.     
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांनी कुटुंबीयांसमवेत मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केले. सामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहूनच मतदान करण्याकडे त्यांचा कल राहिला. धनंजय महाडिक व अरुंधती महाडिक, संजय मंडलिक व वैशाली मंडलिक यांनी मुलांसमवेत आपला मतदानाचा हक्क बजाविला. खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे पत्नी व आई समवेत मतदान केले. कल्लाप्पाण्णा आवाडे व इंदुमती आवाडे या दाम्पत्याने इचलकरंजीत मतदान कर्तव्य पार पाडले. याशिवाय कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासह महापौर सुनीता राऊत, जि.प. अध्यक्ष उमेश आपटे, सर्व आमदार, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, नगरसेवक यांनीही दुपार होण्यापूर्वी मतदान केले.
शहर व ग्रामीण भागात सकाळपासूनच मतदानाचा उत्साह पाहायला मिळत होता. सर्व मतदान केंद्रांवर सकाळपासून रांगा लागल्या होत्या. दुपारी उन्हाचा तडाका वाढला तरी मतदान केंद्रांतील मतदारांची उपस्थिती कायम होती. घरकाम आवरल्यानंतर दुपारनंतर महिला मोठय़ा संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्या होत्या. यंदा ५४ हजार इतकी महिला मतदारांची संख्या वाढल्याने त्याचा परिणाम महिलांच्या उपस्थितीवर दिसूनआला. असाच प्रकार तरुणाईच्या बाबतीतही सर्वत्र दिसून आला. मात्र तरुणांचा कल हा प्रस्थापितांच्याविरोधात असल्याचे जाणवत होते.
सोनुर्ले ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार    
शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्ले या सुमारे १२०० मतदार संख्या असलेल्या गावात आज मतदान झाले नाही. ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचा हा परिणाम होता. अनेक वर्षांपासून रखडलेली कामे करण्यात लोकप्रतिनिधींना आलेले अपयश आणि प्रशासनाची अनास्था याचा राग ग्रामस्थांनी मतपेटीपासून दूर राहून केला.
कलाकारांची जखमीस मदत
मतदानाचे परमकर्तव्य पार पाडण्यापूर्वी त्याला सामाजिक कार्याचे अधिष्ठान मिळवून देण्याचे काम करवीर नगरीतील कलाकारांनी केले. येथील प्रतिज्ञा नाटय़रंग या संस्थेने एका जखमी रुग्णास आज पाच हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले. आकुर्डे गावातील एक व्यक्ती अपघातात सापडली असून तिचा कमरेखालचा भाग दबला गेला आहे. सध्या ही व्यक्ती अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून पुढील काही वर्षे उपचार घ्यावे लागणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. या रुग्णाच्या वैद्यकीय खर्चाला मदतम्हणून प्रतिज्ञा नाटय़रंगचे प्रशांत जोशी व सहकाऱ्यांनी अर्थसाहाय्य देऊन मतदानाच्या कार्याला वेगळी उंची मिळवून दिली.
मतदान प्रक्रियेतील गोंधळ
मतदान प्रक्रियेतील शासकीय यंत्रणेच्या सावळय़ा गोंधळाचे चित्र काही ठिकाणी आज ठळकपणे पाहायला मिळाले. येथील सुर्वेनगर भागात बहुतांशी मतदारांना व्होटर स्लिपचे वाटप झाले नव्हते. त्यामुळे तेथील मतदार सकाळीच संतप्त होऊन मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांशी या मुद्यावरून हुज्जत घालत होते. तर दुसरीकडे हा गोंधळ सुरू असताना स्लिप व्होटर वाटण्याचे काम सुरू केले होते. या गोंधळामुळे मतदान केंद्रातील मतदान प्रक्रिया काही काळ थांबली होती. पोलिसांनी मध्यस्थी करीत हुज्जत घालणाऱ्या मतदारांना केंद्राबाहेर काढले. नंतर आधार कार्ड, मतदान ओळखपत्र व तत्सम ओळखपत्रांच्या आधारे मतदान करण्यास मतदारांना मुभा दिल्याने हा गोंधळ संपुष्टात आला. अब्दुललाट (ता.शिरोळ) येथे तानाजी रावसाहेब कुलकर्णी ही व्यक्ती हयात असताना मतदानयादीत मयत असा उल्लेख झाल्याने येथे वादाचा प्रसंग ओढवला. याच गावात महादेव बाबू कोळी यांच्या नावाने बोगस पोस्टल मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांचा मुलगा शासकीय नोकरीत असून त्यास पोस्टल मतदानाचा अधिकार आहे. तर मतदारयादीत वडिलांच्या जागी मुलाचे व मुलाच्या जागी वडिलांचे नाव असल्याचा गैरफायदा घेऊन कोणीतरी बोगस मतदान घडवून आणल्याची चर्चा या गावात रंगली होती. रुकडी (ता. हातकणंगले) या गावात मतदारांसाठी चहापानाची सोय केली होती. तापमानाचा पारा चढला असताना अशाही वातावरणात चहाचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या कमी नव्हती.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 70 percent voting in hatkanangale and kolhapur
First published on: 18-04-2014 at 04:30 IST