अहिल्यानगर: मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली, आताही मान्सूनची सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या खरीप पिकांच्या ७२.९ टक्के पेरणी झाली आहे. पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, कापसावर मावा व तुडतुड्या तर मका पिकावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. कृषी विभागाकडून ही माहिती उपलब्ध झाली. यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने लागवडीचे नियोजन केलेले आहे. आतापर्यंत ५ लाख ९४ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी झाली आहे.
यंदा मका पिकाचे क्षेत्र वाढले आहे. कृषी विभागाने ७८ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले होते. मात्र, आतापर्यंत ८५ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावर (११० टक्के) मका पिकाची पेरणी झाली आहे. मे महिन्यात झालेल्या अवकाळीमुळे यंदा पेरणीला काहीसा विलंब झाला. तसेच ७ जूननंतर पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली होती. पेरणीनंतर रोपांना पावसाची गरज होती. तो लांबल्याने पिके सुकू लागली होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर आहे, मात्र लाभक्षेत्रात प्रमाण कमी आहे. काही भागात संततधार तर काही भागात भीज पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.
पेरणी झालेले क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे.
अकोले तालुक्यात रोपवाटिका प्रक्षेत्रावर २२३० हेक्टर क्षेत्रावर भात रोपे तयार करण्यात आली आहेत. भात पिकांचे सरासरी क्षेत्र १८ हजार ७४० हेक्टर आहे. आतपर्यंत ६०५० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. बाजरीची ८९ हजार ६२० हेक्टरपैकी ५० हजार ६३६ हेक्टरवर पेरणी झाली. तुरीची ६४ हजार ५८४ पैकी ५८ हजार ८८१ हेक्टर (९१ टक्के), मूग- ५१ हजार ९८० पैकी ४६ हजार ५४० हेक्टर (८९ टक्के), उडीद- ७७ हजार ५९५ पैकी ६२ हजार १९५ (९२ टक्के), सूर्यफूल- २१७ पैकी ४३ हेक्टर (१९ टक्के), भुईमूग- ६ हजार ५९९ पैकी (५२ टक्के), सोयाबीन- १ लाख ७८ हजार ५०५ पैकी १ लाख ५६ हजार १४४ हेक्टर (८७ टक्के) तर कापूस- १ लाख ५५ हजार ३३८ पैकी १ लाख २१ हजार ७१२ हेक्टर (७८ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका पिकावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. याबाबत उपायायोजना करण्याच्या सूचना कृषी विभागाने केल्या आहेत.