लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला  जिल्ह्यात करोना रुग्णवाढ व मृत्यू बरोबरच त्या आजारातून बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७६.७५ टक्के रुग्णांनी करोनावर मात केली. जिल्ह्यात करोनाबाधित आढळून आलेल्या एकूण १३६४ पैकी १०४७ रुग्ण त्यातून बरे झाले आहेत. आणखी २२ करोनाबाधित रुग्णांची शुक्रवारी भर पडली, तर ५७ जणांना सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात एकूण ७४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
अकोला जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णवाढ आणि मृत्यूचे सत्र सुरू होते. २० दिवसांत ४० रुग्ण दगावले आहेत. सुदैवाने आज मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. जिल्ह्यात रुग्ण संख्या सातत्याने वाढत असली तरी उपचाराअंती करोनातून बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे.

आज रुग्णालयातून सुट्टी झालेल्या रुग्णांच्या एकूण संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत १०४७ करोनाबाधित रुग्णांनी आजारावर मात केली आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील एकूण २४२ तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २२० अहवाल नकारात्मक, तर २२ अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १३६४ झाली. सध्या २४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्याापीठात स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रातून आज ५७ जणांना सुट्टी देण्यात आली.

आज सकाळी प्राप्त अहवालात १९ जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात आठ महिला व ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यातील अकोट फैल येथील पाच जण, गुलजारपूरा, लाडीस फैल येथील प्रत्येकी तीन जण, हरिहर पेठ दोन तर उर्वरित राधाकृष्ण प्लॉट, आंबेडकर नगर, कमलानेहरू नगर, तारफैल, इंदिरा कॉलनी, गाडगेनगर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार आणखी तीन रुग्णांची भर पडली. त्यात दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. ते सिंधी कॅम्प, दशहरा नगर व बाळापूर येथील रहिवासी आहेत.

८३५८ अहवाल नकारात्मक
आजपर्यंत एकूण ९७७१ जणांचे नमुने करोना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ९४२१, फेरतपासणीचे १४३ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे २०७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ९७२२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ८३५८ आहे, तर सकारात्मक अहवाल १३६४ आहेत.