सातारा : श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा रुग्णसेवेचा वारसा अखंडितपणे चालविणाऱ्या श्री चैतन्य रुग्णालयात गुरुपौर्णिमदिवशी रक्तदान करून भाविकांनी आगळी वेगळी गुरुदक्षिणा दिली. या शिबिरात ८५ जणांनी रक्तदान करून ‘श्रीं’ची अनोखी सेवा केली.

श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा हा रुग्णसेवेचा वारसादेखील येथील समाधी मंदिर समितीने अखंडितपणे सुरू ठेवला आहे. ‘श्रीं’च्या समाधी मंदिर परिसरात श्री चैतन्य रुग्णालयाच्या माध्यमातून ही विनामूल्य रुग्णसेवा अखंडितपणे आजही सुरू आहे. येथे येणाऱ्या गरजू व गरीब रुग्णांची वाढती संख्या व वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या सकारात्मक बदलामुळे मंदिर समितीने मंदिरापासून काही अंतरावर रुग्णालयाची सर्वसोयींयुक्त भव्य इमारत उभारण्यात आली आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त चैतन्य रुग्णालय व माउली ब्लड सेंटरच्या वतीने घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन सकाळी समाधी मंदिराच्या विश्वस्तांच्या हस्ते ‘श्रीं’च्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले. यावेळी चैतन्य रुग्णालयाचे सर्व कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रक्तदात्यांमध्ये महिलांची संख्याही उल्लेखनीय होती. रक्तदानातून ‘श्रीं’ची सेवा करण्याची संधी उपलब्ध झाल्याची भावना यावेळी अनेक रक्तदात्यांनी व्यक्त केली. श्री महाराजांच्या भक्तांसह परिसरातील रक्तदात्यांनीही या शिबिरात सहभाग नोंदवला. सकाळी नऊपासून चार वाजेपर्यंत या शिबिरात ८५ जणांनी रक्तदान केल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली.