जिल्ह्यात करोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणावर होत असून बुधवारी ८७ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले. १० दिवसात जिल्ह्यात ३०५ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या धुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या ७२७ वर जाऊन पोहचली आहे.

टाळेबंदी शिथील केल्यानंतर दुकाने, व्यापार सुरू झाल्याने शहरात आणि ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढली. त्याचा परिणाम रुग्ण संख्या वाढण्यात झाला आहे. शहरासह शिरपूर तालुक्यात आणि अन्य ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

दोन दिवसांच्या अहवालांपैकी पुरमेपाडा, खंबाळे, मांडळ, वरखेडे, आर्वी, कासारे, थाळनेर, भाटपुरा, वाडी शेवाडी येथे रूग्ण आढळले. सर्वाधिक रुग्ण शिरपूर शहरासह तालुक्यात आढळत आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील रुग्णसंख्या २३३ वर पोहचली आहे. यापैकी १७ जणांचा मृत्यू झाला असून १३५ जणांवर उपचार सुरु आहेत. तर ८१ जणांनी करोनावर मात केली आहे.

धुळे शहरातील रुग्णांचा आकडा ३७९ वर पोहचला आहे. शहरातील दाट लोकवस्तीसह कॉलनी भागातही करोनाचे रुग्ण आढळत आहेत. सध्या धुळे शहरात करोनाचे १४३ रूग्ण असून ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २१४ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण ५० रुग्णांचा मृत्यू झाला असून ३६२ करोनामुक्त झाले आहेत.