अहिल्यानगर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय वैद्यकीय व दंतचिकित्सा विद्यार्थी संघटनेचे (मेडेव्हीजन) आठवे राष्ट्रीय अधिवेशन आज, शनिवारी व उद्या, रविवारी असे दोन दिवस डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.

यापूर्वी लखनऊ येथे झालेल्या अधिवेशनातील ठरावानुसार संघटनेने खासगी रुग्णालयातील उपचारांचे दर कमी करणे, त्यावर सरकारने नियंत्रण आणावे, तसेच सरकारी दवाखान्यातून पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असा ठराव केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सादर केला आहे. ‘मेडेव्हीजन’चे राष्ट्रीय संयोजक डॉ. मौलिक ठक्कर यांनी ही माहिती दिली. या वेळी अभाविपचे प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी व अनुष्का निंबाळकर उपस्थित होते.

दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनाचे उद्घाटन आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मिलिंद निकम, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री एस. बालकृष्ण आदी उपस्थित राहणार आहेत, तर अधिवेशनाचा समारोप रविवारी दुपारी ५ वा. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्रसिंह सोलंकी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

अधिवेशनाचा प्रमुख विषय ‘समग्र आरोग्यसेवा : मन-शरीर-जीवनशैली’ असा आहे. अधिवेशनात मानसिक स्वास्थ्य, प्रतिबंधात्मक आरोग्य, जीवनशैली औषधोपचार, पर्यायी आरोग्यपद्धती, सामुदायिक व पर्यावरणीय आरोग्य या विषयावर चर्चा होणार आहे, तसेच आदर्श व्यक्तिमत्त्व, चिकित्सकीय कार्यशाळा, संशोधन निबंध, पोस्टर सादरीकरण, वैद्यकीय व दंतशिक्षणाच्या भविष्यासंदर्भात चर्चा व अनुभवांचे आदानप्रदान, नवीन संकल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. अधिवेशनात देशभरातून वैद्यकीय व दंतचिकित्सा महाविद्यालयातील किमान ४०० विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मेडेव्हीजनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नढ्ढा यांची भेट घेऊन खासगी रुग्णालयातील उपचारांचे दर व अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचे प्रस्ताव सादर केलेले आहेत.

अधिवेशनात वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रामाणिक वैद्यकीय व्यवसाय, आरोग्य संस्कृती, राष्ट्रवादी व सामाजिक बांधिलकी याबरोबरच आरोग्य व शिक्षण या दोन घटकांना एकत्र आणून वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणे असाही अधिवेशनाचा उद्देश असल्याचे अथर्व कुलकर्णी यांनी सांगितले. अधिवेशनात विविध ठराव केले जाणार आहेत त्याचा मसुदा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सादर केला जाणार असल्याचे डॉ. ठक्कर यांनी सांगितले.