नगर अर्बन सहकारी बँकेला यंदा ९ कोटी १ लाख रुपयांचा नफा झाला असून संचालक मंडळाने सभासदांना २० टक्के दराने लाभांश देण्याची शिफारस केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी दिली. बँक येत्या डिसेंबरमध्ये एटीएम सेवा सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बँकेची शतकोत्तर पाचवी सर्वसाधारण सभा उद्या, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात होत आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांनी बँकेच्या ताळेबंदाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा, उपाध्यक्ष राधावल्लभ कासट तसेच संचालक व अधिकारी उपस्थित होते. बँकेने मागील वर्षी १८ टक्के लाभांश देण्याची शिफारस केली होती, मात्र त्यातील ३ टक्के अद्याप बाकी आहेत. १५ टक्क्य़ाप्रमाणे सभासदांना वितरण करण्यात आले आहे. आरबीआयच्या निकषांची पूर्तता झाल्यानंतर उर्वरित ३ टक्के वितरित केले जातील, असे गांधी यांनी सांगितले.
सभेत यंदा १० उत्कृष्ट कर्मचारी व ५ उत्कृष्ट शाखांचाही सन्मान केला जाणार आहे. बँकेच्या ४७ शाखा आहेत. सुरत व अहमदाबाद येथील शाखांसाठी आरबीआयकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. श्रीगोंदे, मिरजगाव, सावेडी (नगर) येथील शाखांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर तेथील व्यवहारात वाढ झाल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या ठेवीत वाढ होऊन त्या ९३८ कोटीवर पोहोचल्या आहेत. नेट एनपीए गेल्या पाच वर्षांपासून शून्य टक्के आहे. कर्जवितरण ५८५ कोटींवर झाले आहे. बँकेचा स्वनिधी १३ कोटी झाला आहे. बँकेचे नगर तालुका कारखान्याकडील सर्व कर्ज वसूल झाले आहे. मात्र पारनेर, जगदंबा व गणेश कारखान्याकडील वसुली झालेली नाही.
दोन बँकांचे विलीनीकरण
अर्बन बँकेत राहुरी पिपल्स व कोपरगावची बाळासाहेब सातभाई या दोन बँकांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोन्ही बाजूंनी तसा करार करण्यात आला आहे. त्यासाठी उद्या, शुक्रवारी होणाऱ्या सभेत हा विषय सादर करण्यात आला असल्याची माहिती अध्यक्ष खा. गांधी यांनी दिली.