पाच वर्षांतील परिस्थिती आरोग्य विभागाकडून उघड 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

चंद्रपूर : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ात ९६ जणांचा दारूमुळे मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक माहिती आरोग्य विभागाने दारूबंदी समीक्षा समितीकडे सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. लवकरच हा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. या अहवालाची प्रत  ‘लोकसत्ता’च्या हाती लागली आहे.

जिल्हय़ात एप्रिल २०१५ पासून संपूर्ण दारूबंदी लागू आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदी यशस्वी झाली की अयशस्वी, याची वस्तुनिष्ठ समीक्षा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेत समीक्षा समिती गठित केली आहे. या समितीने जिल्हय़ातील दारूबंदीचा अभ्यास सुरू केला आहे. दोन लाखांपेक्षा अधिक लोकांनी दारूबंदी मागे घ्यावी, या आशयाची निवेदने दिली आहेत. लोकांसोबतच समितीने विविध शासकीय कार्यालयांकडूनही याबाबतची माहिती गोळा करणे सुरू केले आहे. या समितीने आरोग्य विभागालाही  दारूबंदीमुळे नेमके किती लोक आजारी पडले, (पान : महाप्रदेश) (पान १ वरून)  किती लोकांचा मृत्यू झाला याबाबतची माहिती मागितली होती. त्यात मद्यपानामुळे झालेल्या मृत्यूंची आकडेवारी समोर आली आहे.  यकृताच्या आजारामुळे ३६ तर कावीळ झाल्यामुळे १ व पोटाच्या विकारामुळे २ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अतिमद्यप्राशनामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहय़ रुग्ण विभागात पाच वर्षांत एकूण ३४७ मद्यपींना दाखल केले गेले तर आंतररुग्ण विभागात १ हजार १२९ मद्यपींना दाखल करण्यात आले होते. दारू सेवन केल्याामुळे यकृताच्या आजाराने पीडित ४०० मद्यपींना बाहय़ रुग्ण विभागात तर ७१८ मद्यपींना आंतररुग्ण विभागात दाखल करण्यात आले होते. मद्य प्यायल्याने कावीळ झालेल्या ४२६ मद्यपींना बाहय़ रुग्ण विभागात तर ९५ मद्यपींना आंतररुग्ण विभागात पाच वर्षांत दाखल केले गेले. अतिमद्यप्राशनामुळे पोटांचा विकार झालेल्या ४८८ मद्यपींना बाहय़ रुग्ण विभाग व १ हजार ३१७ रुग्णांना आंतररुग्ण विभागात दाखल केले गेले. पोलीस विभागाने ३ हजार २४९ मद्यपी रुग्णांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यामध्ये सर्वाधिक ९७० मद्यपी रुग्ण २०१७-१८ मध्ये दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, १ एप्रिल २०१५ ते ३१ जानेवारी २०२० या कालावधीत दारूमुळे मृत पावलेल्या ९१ जणांचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, हा सविस्तर अहवाल आरोग्य विभागाने दारूबंदी समीक्षा समितीला दिला आहे.

भीषण वास्तव..

आरोग्य विभागाने समीक्षा समितीकडे सादर केलेल्या माहितीनुसार, चंद्रपूरमध्ये २०१५ ते २०२० या पाच वर्षांत अतिमद्यप्राशन, यकृताचा आजार, कावीळ व पोटाच्या आजाराने १३६ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अतिमद्यसेवनामुळे पाच वर्षांत ९६  लोकांचे मृत्यू झाले आहे. तसेच या पाच वर्षांत देशीविदेशी दारू प्राशन केल्यामुळे ८  हजार १६९ मद्यपींना विविध आजारांनी ग्रासले. दारूबंदी असल्यामुळे ही आकडेवारी धक्कादायक आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 96 people died after liquor consumption in chandrapur in last five year zws
First published on: 12-03-2020 at 03:50 IST