हिंगोली: तालुक्यातील भांडेगाव येथील सुखदेवानंद विद्यालयात अकरावीच्या वर्गात प्रवेश मिळण्यासाठी विद्यार्थिनीच्या पालकांकडून दोन हजारांची लाच मागितल्याप्रकरणी माजी प्राचार्य तथा शिक्षण संस्थेचे पदाधिकारी प्रकाश निरगुडे यांच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भांडेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या दहावी उत्तीर्ण मुलीने सुखदेवानंद विद्यालयात अकरावीच्या वर्गात प्रवेश मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरला होता. तक्रारदाराच्या मुलीला प्रवेश मिळणार असा संदेश त्यांच्या मोबाइलवर आला होता. प्रवेश घेण्यासाठी एक जुलै २०२५ रोजी सुखदेवानंद विद्यालय, भांडेगाव येथे बोलवले. त्यानुसार पालक तिथे गेल्यानंतर विद्यालयाचे माजी प्राचार्य आणि संस्थेच्या कार्यकारी मंडळातील विद्यमान सदस्य प्रकाश चक्रधर निरगुडे यांच्याशी भेट झाली. भेटीदरम्यान निरगुडे यांनी मुलीचा प्रवेश करायचा असेल, तर तीन हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणत तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली.
लाच देणे मान्य नसल्याने विद्यार्थिनीच्या पालकाने २ जुलै रोजी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीची पंच, साक्षीदारासमक्ष पडताळणी केली असता, निरगुडे यांनी तडजोडीअंती दोन हजार रक्कम स्वीकारण्यास सहमती दर्शवल्याचे स्पष्ट झाले.
अकरावीत प्रवेशासाठी शासकीय नियमानुसार ६६८ रुपये प्रवेशशुल्क असताना, निरगुडे यांनी तीन हजारांची मागणी केली. त्यामुळे निरगुडे यांच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.