राजापूर : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या दुचाकीला भरधाव गाडीने धडक देऊन खून केल्याचा गुन्हा पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरोधात पोलिसांनी दाखल केला आहे. गेल्या सोमवारी घडलेल्या या प्रकारानंतर मंगळवारी पोलिसांनी आंबेरकरला अटक करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला. त्याला ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पत्रकार संघटना, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर बुधवारी पोलिसांनी आंबेरकरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे समर्थन करणाऱ्या प्रमुख नेतेमंडळींमध्ये आंबेरकर याचा समावेश आहे. ‘महानगरी टाइम्स’चे राजापूर तालुका प्रतिनिधी वारिशे सोमवारी तालुक्यातील कोदवली येथील पेट्रोल पंपाजवळ असताना आंबेरकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या प्रकरणी वारिशे यांचे मेहुणे अरविंद दामोदर नागले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर (रा. राजापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सोमवारी संबंधित वृत्तपत्रात आंबेरकर संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर दुपारी हा प्रकार घडला.