सोलापूर : विद्युत जनित्राचे दुरुस्तीचे काम करताना अचानकपणे वीजपुरवठा सुरू होऊन विजेचा धक्का बसून एका कंत्राटी वीज कर्मचाऱ्याचा बळी गेला. मंगळवेढा शहरात ही दुर्घटना घडल्यानंतर संतप्त जमावाने महावितरणच्या उपविभागीय कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर मृतदेह आणून ठेवला आणि आंदोलन केले होते. अखेर चौकशीसह संबंधित दोषींवर कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अतिश जयराम लांडे (वय २८, रा. नागणे गल्ली, मंगळवेढा) असे मृत कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. मंगळवेढा शहरात कारखाना चौकात एका नादुरुस्त विद्युत जनित्र दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यासाठी तेथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुरुस्तीचे काम करण्यासाठी अतिश लांडे हा उंच खांबावर चढला होता. काम सुरू असताना अचानकपणे तेथील वीजपुरवठा सुरू झाला आणि विजेचा धक्का बसून क्षणार्धात अतिश लांडे हा खांबावरून खाली जमिनीवर कोसळला. त्यास उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु अखेर त्याचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मृत अतिश लांडे यांच्या कुटुंबीय आणि नातेवाइकांसह शेकडोंचा जमाव मृतदेहासह मंगळवेढ्यातील महावितरणच्या उपविभागीय कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडकला. मृतदेह तेथेच ठेवून आंदोलन करण्यात आले. घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जमावाची मागणी होती. दरम्यान, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयमाने परिस्थिती हाताळत चौकशीचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. पोलीस अधिकाऱ्यांनीही शिष्टाई केली. मंगळवेढा पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.