अनेक कंपन्या सर्वसामान्य नागरिकांना भरमसाठ पैशांचा मोबदला देण्याचं आमिष दाखवत पैशांची गुंतवणूक करण्यास भाग पाडतात. दुप्पट पैशांचे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची सर्रास लूट केली जात आहे. असाच एक प्रकार नुकताच धुळे जिल्ह्यात उघड झाला आहे. गुजरात राज्याच्या सूरत येथील शुकुल ग्रुप ऑफ कंपनीजने गुंतवणुकीच्या रकमेवर प्रत्येक महिन्याकाठी १० टक्के देण्याचे आमिष दाखवून खान्देशातील ४ हजार पेक्षा अधिक लोकांची फसवणूक करून तब्बल ७५ कोटी रुपयांचा चुना लावण्यात आला आहे. या प्रकरणी सुरत येथील शुकुल ग्रुप ऑफ कंपनी विरुद्ध दोंडाई पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ उत्तर महाराष्ट्रातील लोकांची ५६ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती आणि फसवणुकीची रक्कम वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- “…तर कदापी खपवून घेतलं जाणार नाही”, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना इशारा; म्हणाले, “राज्याला गाजर…”

५६ कोटी रुपयांची गुंतवणूक

सूरत येथील प्रदीप शुक्ला ऊर्फ मुन्ना शुकूल, धनंजय बराड, देवेश सुरेंद्र तिवारी, संदीपकुमार मनुभाई पटेल या चौघांनी पूर्वनियोजित कट रचून शुकूल वेल्थ ॲडव्हायजरी, शुकूल वेल्थ क्रिएटर, मनी फाउंडर, डेली गेट अशा चार कंपन्यांची स्थापना केली. आकाश मंगेश पाटील आणि मंगेश नारायण पाटील या पिता पुत्रांना हाताशी धरून सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीची जाहिरात सुरू केली. या कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा १० टक्के रक्कम मिळेल, असे आमिष दाखवले. सन २०१९ ते १३ सप्टेंबर २०२२ पर्यंत उत्तर महाराष्ट्रातील ४००० पेक्षा अधिक नागरिक या आमिषाला बळी पडले. या नागरिकांनी ५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे रक्कम मिळत असल्याने गुंतवणूकदार वाढत गेले. परिणामी मोठ्या संख्येने लोक या फेक कंपनीच्या जाळ्यात अडकले.

हेही वाचा- उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना भाजपासंदर्भात सूचक इशारा; म्हणाले, “महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते…”

प्रकरणाचा अधिक तपास सुरु

तसेच स्वतःला या फेक कंपनीचे महाराष्ट्र प्रमुख सांगणारे दोंडाईचा येथील पिता- पुत्रांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर चार संशयित आरोपी हे अद्याप फारार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली.