महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद सुरु असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवरील १४ गावांचा प्रश्नही पुन्हा चर्चेत आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती जिल्ह्यामध्ये ही गावं आहेत. मात्र या गावांमधील एका घरात अगदीच विचित्र प्रकार पहायला मिळत असून हे घर पंचक्रोषीमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

या घरातील स्वयंपाकघर हे महाराष्ट्रात आहे तर हॉल तेलंगणमध्ये. हे वाचायला विचित्र वाटत असलं तरी खरोखर या घराच्या मध्यभागातून दोन्ही राज्यांची सीमा जाते. हे घर महाराष्ट्रातील जिवती आणि तेलंगणमधील महाराजगुंडा जिल्ह्यामध्ये हे घर विभागलं गेलं आहे. या घरामध्ये पवार कुटुंबीय राहतात. घरात एकूण आठ खोल्या आहेत. त्यापैकी काही खोल्या एका राज्यात तर काही दुसऱ्या राज्यात आहेत. त्यामुळेच पवार कुटुंबियांना मालमत्ता करही दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने भरावा लागतो.

मागील ५३ वर्षांपासून दोन्ही राज्यांमधील जमिनीसंदर्भात झालेल्या सर्वेक्षणानंतर हे घर दोन राज्यांच्या सीमांमध्ये वाटले गेले. या घरातील चार खोल्या महाराजगुंडा (तेलंगणमध्ये) तर चार जिवती (महाराष्ट्रात) जिल्ह्यात आहेत. या घरातील सदस्य असलेल्या उत्तम पवार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दोन्ही राज्यांमधील खोल्यांच्या क्षेत्रफळानुसार वेगवगेळा संपत्ती कर पवार कुटुंबीय भरतं. मात्र तेलंगणकडून मिळणाऱ्या सुविधा या महाराष्ट्रापेक्षा अधिक आहेत.

“१९६९ मध्ये जेव्हा दोन्ही राज्यांच्या सीमांसंदर्भातील सर्वेक्षण करण्यात आलं त्यावेळी आम्हाला अर्ध घर आंध्रप्रदेशमध्ये (सध्याचं तेलंगण राज्य) आणि अर्ध महाराष्ट्रात राहील असं सांगण्यात आलं. आम्हाला यामुळे काही अडचण आली नाही. आम्ही दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये कर भरतो. मात्र तेलंगण सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांचा लाभ आम्हाला अधिक मिळतो,” असंही पवार कुटुंबाने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवार कुटुबाचं घरचं विभागलं गेल्याने त्यांची चर्चा असली तरी या भागातील १४ गावांमधील नागरिकांची थोड्याफार फरकाने अशीच अवस्था आहे. या गावांमध्ये मूलभूत सुविधा ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या बांधकाम आणि सुविधांचा आभाव, रस्ते, पाण्याचा आभाव हा महाराष्ट्रातील भागामध्ये जास्त प्राकर्षाने जाणवतो असं अनेकजण सांगतात. या उलट तेलंगणमधील भारत राष्ट्र समितीचे नेते के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या सीमाभागातील गावांमध्ये चांगल्या सुविधा, शाळा, आर्थिक मदत दिली आहे.