आयुष्याची दोर हातात ठेवणाऱ्या देवाचे आयुष्य कोण वाढवेल? असा माणूस आहे. त्याचे नाव मॅनेजर सिंग. पुरातत्त्व विभागात रासायनिक प्रक्रिया विभागाचे अधीक्षक असणाऱ्या या व्यक्तीने तुळजाभवानी, पांडुरंग आणि अलीकडेच महालक्ष्मीच्या मूर्तीचेही संवर्धन केले. देवतांच्या मूर्त्यां आणि देवालय उजळून टाकणाऱ्या सिंग यांची ‘मूर्तीचे आयुष्य वाढविणारा माणूस’ अशी ओळख बनू लागली आहे. त्यांनी आतापर्यंत २५पेक्षा अधिक देवतांच्या मूर्त्यांंसह लेणी संवर्धनातही मोठी कामगिरी बजावली आहे.
रसायनशास्त्रात पीएच. डी. मिळविणाऱ्या मॅनेजर सिंग यांनी राज्यातील प्रमुख देवतांच्या मूतीर्ंची झालेली झीज कमी करण्यात मोठे योगदान दिले. महालक्ष्मीच्या मूर्तीला वज्रलेप देताना त्यांनी काही नवे प्रयोगही केले. दूर्वाच्या रसाचा उपयोग त्यांनी पहिल्यांदाच मूर्ती संवर्धनात केला. केवळ दूर्वाच नाही, तर बेहडा, चंदन पावडर, त्याचा अर्क, गाईच्या शेणापासून तयार केलेले काजळ आदींचा उपयोग त्यांनी महालक्ष्मीच्या वज्रलेपाच्या वेळी कोल्हापूर येथे केला. इथाइल सिलिकेट या रसायनाच्या मदतीने कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूर्ती आता श्रद्धावान भाविकांसाठी अधिक उजळ स्वरुपात दर्शनास उपलब्ध आहे. तत्पूर्वी मॅनेजर सिंग यांनी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या तुळजाभवानी आणि पांडुरंगाची मूर्तीही अशीच उजळवून दिली. त्यांनी केलेल्या रासायनिक प्रक्रियांमुळे मूर्तीचे आयुष्यमान वाढले.
दही-दूध आणि अभिषेकातील वेगवेगळ्या पदार्थामुळे मूर्तीची झीज होत असल्याच्या घटना मागील दशकात प्रामुख्याने समोर आल्या. पूजेच्या साहित्यांमध्ये रासायनिक पदार्थाचा वापर कमी झाला, तरच देवतांच्या मूर्त्यां टिकून राहू शकतील, असे ते सांगतात. बहुतांश मूर्त्यांंवर रासायनिक प्रक्रिया केल्याने श्रद्धावान भाविक दुखावले जातात. मात्र, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दर्शन घेणाऱ्या भाविकांमध्ये त्या प्रक्रियेविषयी अजिबात राग नसतो. त्यामुळेच तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर या तीनही प्रमुख देवतांच्या मूर्तीना वज्रलेप करण्यात आले.
वणी येथील सप्तश्रुंगी देवीच्या मूर्तीवर शेंदूर लावला जातो. हा शेंदूर नैसर्गिक वनस्पतीपासून बनवता यावा, या साठी मॅनेजर सिंग यांनी गेले काही दिवस जिवाचे रान केले. झाडपाला गोळा केला आणि नैसर्गिक शेंदूरही वणी येथील मंदिराच्या पुजाऱ्यांकडे पाठविला. बऱ्याचदा मूर्तीवर एमसील आणि ईपॉक्सी या रसायनांचा अतिरिक्त मारा केला जातो. कोल्हापूरच्या मूर्तीवर तर तब्बल ४ किलो अतिरिक्त वजन होते. ते काढल्यानंतर ही मूर्ती उजळली आहे. येत्या काही दिवसांत ते पंढरपूरच्या मंदिरालाही रासायनिक लेप लावणार आहेत. जेजुरीचे मंदिरही उजळवून टाकण्याच्या कामात त्यांनी सहकार्य केले. चंद्रभागेतील पुंडलिक मंदिरातही त्यांनी काम केले. प्रत्येक मूर्तीचे संवर्धन करताना वेगवेगळ्या कोनातून त्याचे छायाचित्र घेतले जाते. महालक्ष्मीच्या वज्रलेपाच्या वेळी एक हजार फोटोग्राफ्स घेण्यात आले. त्या आधारे मूर्तीचे आरेखन तपासण्यात आले. त्यानंतर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. राज्यातील प्रमुख देवतांच्या मूर्तींवर रासायनिक प्रक्रियेच्या आधारे करण्यात आलेल्या संवर्धनामुळे मॅनेजर सिंग यांचे नाव चर्चेत आहे.
अजिंठा लेणीच्या रसायनांचा अभ्यास
गोरखपूर विद्यापीठातून पीएच. डी. मिळविल्यानंतर पुरातत्त्व विभागात नोकरी करणाऱ्या मॅनेजर सिंग यांनी अजिंठा लेणीतील चित्र रंगवताना कोणती रसायने वापरली होती, याचा अभ्यास केला. त्यांचे आतापर्यंत ४८ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.