अकोल्यात आईनेच आपल्या पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. महिलेने मुलीची गळा दाबून हत्या केल्यानंतर नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात तिची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. न्यायालयात हजर करण्यात आलं असता महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
महिला गेल्या महिन्यात आपल्या मुलीला घेऊन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. यावेळी डॉक्टरांनी मुलीला घेऊन अकोल्यातील जिल्हा रुग्णालयात जाण्यास सांगितलं. मात्र तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. पण शवविच्छेदन करण्यात आलं असता मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचं स्पष्ट झालं. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
पोलिसांनी महिलेला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. महिलेला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आलं असता दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी दिली आहे.