सांगली : कुपवाडमधील मंगलमूर्ती कॉलनीमध्ये शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर उभारण्यात आलेल्या वादग्रस्त प्रार्थनास्थळाचे बांधकाम अनाधिकृत असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळले. त्यामुळे मस्जिद विश्वस्तांची मदत घेऊन महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने अवैध बांधकाम सायंकाळी हटवण्यास सुरुवात केली. या अनाधिकृत प्रार्थनास्थळाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात प्रशासनाने कारवाई केली नाही, तर मनसैनिक हे बांधकाम पाडतील, असा इशारा दिल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मंगलमूर्ती कॉलनीमध्ये प्रार्थनास्थळ उभारण्यावरून फेब्रुवारी अखेरीस स्थानिक नागरिक व प्रार्थनास्थळाचे विश्‍वस्त यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल झाल्या असून १५ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सहायक निरीक्षक संजय क्षिरसागर यांनी दिली.

हेही वाचा – “काँग्रेसच्या बगलबच्च्यांनी मोदींचा…” राहुल गांधींना कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अशा प्रवृत्तींना…”

मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी याबाबत मुद्दा उपस्थित केल्यानंतर तातडीने महापालिकेच्या नगररचना विभागाने आजच जागेवर जाऊन पाहणी करीत मोजमापही केले. तर या ठिकाणी आज मनसेचे जिल्हा प्रमुख तानाजीराव सावंत, भाजपाचे नितीन शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. मनसेचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी सांगितले, या परिसरात हिंदू समाज बहुसंख्येने असताना प्रार्थनास्थळाची उभारणी अवैधरित्या सुरू आहे. हे काम प्रशासनाने तातडीने काढले नाही, तर मनसे आपल्या पद्धतीने हे अनाधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करेल. दरम्यान, याबाबत आयुक्त पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, वादग्रस्त जागेवर प्रार्थनास्थळ बांधण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसून, कायद्यानुसार ते काढण्यात येईल.

हेही वाचा – शिवसेना संसदीय नेतेपदावरून हटवल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१२ पासून या ठिकाणी पत्र्याचे शेड होते. सध्या या ठिकाणी स्वच्छता गृहाचे बांधकाम करण्यात आल्याचे आढळून आले असून, ही जागा प्राथमिक शाळेसाठी आरक्षित आहे. या ठिकाणी दोन-अडीचशे घरे असून हा भाग गुंठेवारीत आहे. या गुंठेवारीचे नियमितीकरणही झालेले नाही. दरम्यान, सायंकाळपासून प्रार्थनास्थळाच्या विश्वस्तांची मदत घेऊन सायंकाळपासून अतिक्रमण निर्मुलन पथकाने अनाधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात केली आहे. उपायुक्त स्मृती पाटील व पथक या ठिकाणी कार्यरत असून, उशिरापर्यंत अवैध बांधकाम हटवण्याचे काम सुरू होते.