सांगली : महिलेच्या शरिरातून तीन किलो वजनाची गाठ शस्त्रक्रिया करून काढण्यात इस्लामपुरातील प्रकाश हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आले. पाटण तालुक्यातील ५५ वर्षांची महिला पोटदुखीने तीन महिन्यांपासून त्रस्त होती. विविध रुग्णालयात प्राथमिक उपचार करूनही वेदना कमी होत नसल्याने ती प्रकाश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली.
वैद्यकीय तपासणीत तिच्या अंडाशयामध्ये अवांतर मांसाचा गोळा तयार झाल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना याची कल्पना देऊन जोखमीची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि रुग्णानेही शस्त्रक्रियेस सहमती दर्शवली. डॉ. दिग्विजय सुरेश कदम व डॉ. सायली प्रवीण साळुंखे यांनी डॉ. उदयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेसाठी दोन तासांचा अवधी लागला. शरीराबाहेर गाठ काढून तिचे वजन मोजले असता तब्बल तीन किलो भरले.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून, तिच्या पोटदुखीच्या त्रासातून तिला आता नवीन जीवन मिळाले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, योग्य वेळी निदान आणि शस्त्रक्रिया झाल्यामुळे रुग्णाचा जीव वाचू शकला. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल प्रकाश हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.