रत्नागिरी :रत्नागिरी शहराच्या जवळच असणा-या कुवारबांव येथे एका महिलेची ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली ऑनलाईन ९ लाख ९६ हजार ९९१ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार ८ मे २०२५ ते २७ मे २०२५ दरम्यान घडली असून, ६ जून २०२५ रोजी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रोहिणी मंदार गीते (वय ४५) रा. साईगण, वृंदावन सोसायटी, कुवारबांव, रत्नागिरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काही अज्ञात आरोपींनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर ‘वर्क फ्रॉम होम’ संदर्भात एक जाहिरात ठेवली होती. स्केचर्स कंपनीमध्ये कामासाठी त्यांना टेलिग्राम अकाऊंटवर माहिती देण्यात आली.
सुरुवातीला कस्टम ऑर्डरसाठी भरलेल्या रकमेवर त्यांना योग्य परतावा देण्यात आला. त्यानंतर, रोहिणी गीते यांनी बँक ऑफ इंडिया आणि डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या खात्यांमधून एकूण ९,९६,९९१ रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले. मात्र, या रकमेवर त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. तसेच गुंतवलेली मूळ रक्कमही परत मिळाली नाही. यात त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या गुन्ह्यात एक अज्ञात महिला आणि ‘प्रवीण’ नावाचा एक व्यक्ती (पूर्ण नाव, गाव, पत्ता अज्ञात) यांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (४), ३ (५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) नुसार गुन्हा क्रमांक २४१/२०२५ दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.