शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा अंतिम निकाल बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गट एकमेकांसमोर पुन्हा एकदा उभे ठाकले असून टीका-टिप्पणी होत असल्याचं दिसत आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेरिटवर आधारित निकाल लागेल, अशी सूचक टिप्पणी केली असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी निकालाआधीच लवाद एकनाथ शिंदेंना भेटतात म्हटल्यावर निकाल काय लागणार, अशा प्रकारची टिप्पणी केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांच्या निकालाबाबत भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीचा उल्लेख केला. “अध्यक्ष स्वत: मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जातात. न्यायमूर्ती स्वत: आरोपीला भेटायला जात आहेत. असं मी कधीच ऐकलं नव्हतं. तुम्ही लवाद म्हणून काम करत असताना असं करू शकत नाही”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“आता न्याय काय मिळणार?”
दरम्यान, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाई़ड या उक्तीचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंनी राहुल नार्वेकरांवर टीका केली. “दीड वर्षं त्यांनी एवढं खेचल्यानंतर न्याय काय मिळणार? एक तर संविधानानुसार निर्णय दिला तर हे ४० गद्दार अपात्र झाले पाहिजेत. पण जे संविधान भाजपाला लिहायचंय, आंबेडकरांचं संविधान बदलायचंय, त्यानुसार निर्णय दिला तर आम्ही अपात्र होऊ”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
एकनाथ शिंदेंची राहुल नार्वेकरांच्या निकालाबाबत सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “मी एवढंच सांगतो की…”
“हे फक्त शिवसेनेबद्दल नाही. जग बघतंय. भारतात लोकशाही टिकणार की नाही? यासाठी सगळ्या जगाचं लक्ष महाराष्ट्रावर आहे. हे स्वत:चं नाव खराब करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे”, अशी अपेक्षाही आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली आहे. तसेच, “हे सरकार टिकलं, तर मंत्रालयही सूरत किंवा अहमदाबादला हलवतील”, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
रवींद्र वायकरांवर ईडीची कारवाई
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर आज सकाळी ईडीनं छापा टाकला. त्यावरून आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. “आता कुणालाही कुणाची भीती वाटत नाही. ईडी, सीबीआय, आयटी हे एनडीएचे घटक झाले आहेत. सत्तेच्या विरोधात लढणाऱ्यांवर हे घटक दबाव आणत राहतात”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
