Aamir Khan महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीवर कॉफी टेबल बुकचं प्रकाशन मुंबईत करण्यात आलं. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून हे पुस्तक तयार करण्यात आलं आहे. अभिनेता आमिर खान यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे आपलं भाग्य असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे अभिनेता आमिर खानने?
२०१४ च्या सुमारास महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती होती. राज्यातील शेतकरी अत्यंत कठीण काळ अनुभवत होता. शेतकरी आत्महत्या वाढल्या होत्या. त्याच वर्षी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. थोड्याच दिवसात त्यांनी जलयु्क्त शिवार योजना त्यांनी जाहीर केली. नेमक्या याच काळात शेतकऱ्यांच्या शेतात बाराही महिने पाणी राहिल, यासाठी करता येईल? याचा विचार मी आणि किरण करत होतो. या कामासाठी आम्हाला देवेंद्रजींनी मोलाची मदत केली. या काळात शेतकरी वर्गाविषयीची त्यांची तळमळ आणि सहृदयता आम्हाला दिसून आली.
देवेंद्र फडणवीस यांचा मी फॅन झालो आहे
देवेंद्र फडणवीस यांना पहिल्यांदा भेटलो त्याला आता दहा वर्षे झाली आहेत. त्या पहिल्याच भेटीत त्यांची दूरदृष्टी काय ते पाहिलं आणि मी मंत्रमुग्ध झालो. त्यांच्या विचारांमध्ये स्पष्टता आहे. काम करुन घेण्याची त्यांची अनोखी हातोटी आहे. त्यांच्या या क्षमतांचा मी फॅन झालो आहे. पाणी आणि शेती या दोन विषयांशी संबंधित योजनांच्या अनुषंगाने मी गेली दहा वर्षे त्यांच्यासह काम करतो आहे. प्रत्येक वर्षी त्यांच्या विषयीचा आदर आणि प्रेम वाढतच गेलं आहे.
महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असलेला नेता म्हणजे फडणवीस-आमिर खान
महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी देवेंद्र फडणवीस यांची असते हे मी अनुभवलं आहे. कोणतीही अडचण असो, ती नीट समजून घेणं आणि त्यावर योग्य तो तोडगा काढणं यात देवेंद्र फडणवीस यांचा हातखंडा आहे. अत्यंत कुशाग्र बुद्धी, संयम, समतोल वृत्ती, व्यावहारिक असले तरीही संवेदनशील अशी त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. बोले तैसा चाले असे त्यांचे वागणे आहे. त्यांनी आश्वासन दिलं आणि ते काम झालं नाही असं कधीही घडलं नाही. देवेंद्रजींचा पाठिंबा नसता तर आम्ही पाणी फाऊंडेशनचं काम पुढे नेऊच शकलो नसतो, मी आज हे नम्रपणे नमूद करु इच्छितो. देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने महाराष्ट्राला उमदा विकासपुरुष लाभला आहे, हे महाराष्ट्राचे भाग्य आहे असं मी समजतो. असं आमिर खानने म्हटलं आहे.