महापौर अलका राठोड यांच्या खासगी बंगल्याचे बेकायदा बांधकाम दंडात्मक आकारणी करून नियमित करण्याच्या पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या निर्णयाला आक्षेप घेत सोलापूरच्या आम आदमी पार्टीने या प्रकरणाकडे निवडणूक आयोगाचे लक्ष असताना आता महापौरांच्या बंगल्याच्या मालकीहक्काबाबतही हरकत घेतली आहे. यासंदर्भात येत्या बुधवारी आपचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व पालिका आयुक्तांना भेटणार आहे.
महापौर अलका राठोड यांचे पती दगडू राठोड हे सभासद असलेल्या जवाहर गृहनिर्माण सहकारी संस्थेत त्यांचा बंगला आहे. ही गृहनिर्माण संस्था समूह गृहनिर्माण संस्था असल्यामुळे तेथील निवासस्थानांसमोर पक्क्य़ा स्वरूपात संरक्षक भिंती उभारता येत नाहीत. तर साधे तारेचे कुंपण घालण्याची मुभा असते. परंतु याबाबतचा कायदा धाब्यावर बसविण्यात आल्याचे आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते विद्याधर दोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दगडू राठोड यांचा बंगला असलेल्या जवाहर गृहनिर्माण संस्थेला राज्य शासनाकडून भूखंड उपलब्ध झाला असून त्यावर सभासदांची निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. या निवासस्थानांची जागा लिजवर मिळाल्यामुळे त्याची खरेदी-विक्री करता येत नाही. त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. परंतु दगडू राठोड यांच्या बंगल्याच्या जागेवर राठोड यांची मालकी लागली आहे. या प्रकरणात तत्कालीन नगर भूमापन अधिकाऱ्यांचाही सहभाग दिसून येतो. याप्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी दोशी यांनी केली. पालिका आयुक्त गुडेवार यांनी अनेक प्रकरणात धाडसी कारवाई करून जनमानसात विश्वासार्हता निर्माण केली आहे. परंतु महापौर अलका राठोड यांच्या अवैध बंगल्याच्या बांधकाम प्रकरणात आयुक्तांनी पुरूषार्थ का दाखविला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. स्वत: आयुक्त गुडेवार यांची अशा पध्दतीनेच बंगला बांधण्याची व त्याचे बांधकाम पुढे नियमित करण्याची तयारी आहे का, असाही सवाल दोशी यांनी उपस्थित करीत या प्रकरणात आयुक्तांवर जनरेटय़ाच्या माध्यमातून दबाव निर्माण केला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी चंदूभाई देढिया व रुद्रप्पा बिराजदार हे उपस्थित होते.