आजवर कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या शहरातील अतिशय वर्दळीच्या महात्मा गांधी चौकावर भाजप व आपने कार्यालय थाटून वर्चस्व मिळविले आहे. आपने तर कॉंग्रेसच्या पारंपरिक जागेतच कार्यालय थाटल्याने लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस प्रथमच गांधी चौकातून बाहेर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या शहरातील प्रमुख चौक, अशी गांधी चौकाची ओळख आहे. ब्रिटीशांच्या काळापासूनच या चौकात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या जाहीर सभा येथे झाल्या. देश स्वतंत्र झाल्यानंतर गांधी चौक विविध राजकीय पक्षांच्या जाहीर सभांसाठी ओळखला जातो. याच चौकात महापालिकेची वास्तू आहे आणि त्याला लागून मोकळी जागा आहे. याच चौकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी येऊन गेले, तर शत्रूघ्न सिन्हा, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या बडय़ा नेत्यांसोबतच विविध राजकीय पक्षांच्या अनेक छोटय़ा मोठय़ा नेत्यांच्या सभा झाल्या. लोकसभा, विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकीत हा चौक अधिक चर्चेत येतो. कारण, निवडणुकीच्या काळात सर्वच राजकीय पक्षात गांधी चौकात सभा घेण्याची चढाओढ असते.
या चौकावर गेल्या कित्येक वर्षांंपासून कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. गेल्या कित्येक लोकसभा व विधानसभा निवडणुकांपासून कॉंग्रेस पक्षाचे मुख्य निवडणूक कार्यालय याच गांधी चौकात थाटण्यात येते होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांचे घर याच चौकात आहे. त्यामुळे कांॅग्रेसच्या राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र गांधी चौक आहे, तसेच मनपाच्या प्रत्येक निवडणुकीत येथूनच विजयी उमेदवाराची रॅली निघते, प्रचार सभा, विविध सामाजिक आंदोलन, तसेच विविध कार्याक्रमांच्या रॅली, १५ ऑगस्ट व २६ जानेवारीचे कार्यक्रम कॉंग्रेसच्या वतीने याच चौकात साजरे केले जातात. आजवर कॉंग्रेसचे वर्चस्व असलेल्या शहरातील अतिशय वर्दळीच्या महात्मा गांधी चौकावर भाजप व आपने कार्यालय थाटून वर्चस्व मिळविले आहे. आपने तर कॉंग्रेसच्या पारंपरिक जागेतच कार्यालय थाटल्याने व लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस प्रथमच गांधी चौकातून बाहेर पडल्याची चर्चा राजकीय पक्षात आहे. आपने जेथे कार्यालय थाटले तेथे दरवर्षी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रचार कार्यालय असायचे. याच कार्यालयालगत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी उपोषण केले होते. प्रत्येक निवडणुकीत या चौकात कॉंग्रेसचा माहौल असतो, परंतु यावर्षी गांधी चौकातून कॉंग्रेस बाहेर पडली असून तेथे आप व भाजपने वर्चस्व मिळविले आहे.
याच चौकात आपच्या कार्यालयापासून अवघ्या काही मिटर अंतरावर भाजपने मुख्य प्रचार कार्यालय थाटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. या उद्घाटनानंतर याच चौकात फडणवीस यांची जाहीर सभा झाली, तर शेतकरी संघटना व आपचे उमेदवार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी पार पडले. विशेष म्हणजे, गांधी चौकात कार्यालय राहिले तर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व अन्य लोकांशी संपर्क साधणे सहज सोपे होते, तसेच वर्दळीच्या दृष्टीने सुध्दा गांधी चौक सोईस्कर आहे, परंतु कॉंग्रेसच्या हातून गांधी चौक निघून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. आपला माजी नगराध्यक्ष व कॉंग्रेस कार्यकर्ते डॉ. सुरेश महाकुलकर यांनी जागा भाडेतत्वावर दिल्याचे सांगण्यात येत आहे. ही वस्तुस्थिती असली तरी त्यातही राजकारण असल्याचे बोलले जात आहे, तर तेथे भाजपने कार्यालय उघडले आहे ती जागा कॉंग्रेसने पहिले कार्यालयासाठी मागितली होती, परंतु भाजपचे कार्यालय सुरू करायचे असल्याने तेथेही कॉंग्रेसला नकार मिळाला.  भाजपने तेथे कार्यालय उघडले आहे तेथे कॉंग्रेसचे युवा नेते राहुल पुगलिया यांच्या दुर्गादेवी मंडळाच्या वतीने नवरात्रात देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते.