मंगळवारी रात्री उशीरा माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. तानाजी सावंत यांच्या घरी जाताना कात्रज चौकात हा हल्ला झाला होता. या प्रकरणी शिंदे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अब्दुल सत्तार यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ”आमच्या आमदारांवर असे हल्ले होत असतील, तर आम्हालाही त्यांच्यावर हल्ले करावे लागतील”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Yes Bank-DHFL Case : ‘ईडी’कडून ४१५ कोटींच्या मालमत्तेवर टाच; अविनाश भोसले व छाब्रियांची मालमत्ता घेतली ताब्यात

“आम्हालाही हल्ले करावे लागतील”

या हल्ल्याचा जितका निषेध करावा, तितका कमी आहे. ही तत्वाची लढाई आहे, ती निश्चित लढावी. पण असा हल्ला करणं चुकीचं आहे. असे हल्ले आमच्या आमदारांवर होत असतील तर आम्हालाही त्यांच्यावर असे हल्ले करावे लागेल. एका कडून मारल्या जात असेल तर दुसऱ्याकडून बघायची भूमिका घेतल्या जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

हेही वाचा – उदय सामंत हल्ला प्रकरण : पुण्याच्या शिवसेना शहरप्रमुखांसहीत पाचजणांना अटक; शिवसेना विरुद्ध शिंदे गट संघर्ष चिघळण्याची शक्यता

“..तर उद्धव ठाकरेंवरही कारवाई व्हायला हवी”

या हल्ला करणाऱ्या दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई कारवाई करावी. तसेच या हल्ल्याची मागे कोण आहे, याचा सुद्धा शोध घ्यायला हवा, असेही ते म्हणाले. शिवसेना नेते बबन थोरात यांनी दिसेल तिथे आमदारांच्या गाड्या फोडा, त्यांचा सत्कार उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल, असे वक्तव्य केले होते. याबाबतही अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली. ”बबन थोरात यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. त्यांच्यावरही योग्य ती कारवाई होईल. कोणी असे वक्तव्य करत असेल आणि उद्धव ठाकरे त्यांचा सत्कार करत असतील, तर उद्धव ठाकरेंचा यासर्व प्रकाराला पाठिंबा आहे, असा त्याचा अर्थ निघतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.