अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर नवा वाद सुरु झाला आहे. कंगनाच्या या वक्तव्यावर अनेकांनी आक्षेप घेतला असून समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनीसुद्धा कंगनाला टोला लगावला आहे. “जे लोक महाराष्ट्रात स्वत:चं पोट भरतात आणि महाराष्ट्राबद्दलच चुकीचं बोलतात, अशा लोकांना इथे राहण्याचा हक्क नाही,” अशा शब्दांत त्यांनी कंगनाला सुनावलंय.

एका वृत्तवाहिनीला मुलाखतीत अबू आझमी म्हणाले, “जे लोक महाराष्ट्रात स्वत:चं पोट भरतात आणि महाराष्ट्राबद्दलच चुकीचं बोलतात, अशा लोकांना इथे राहण्याचा हक्क नाही. त्यांना अजिबात कोणतीच सुरक्षा मिळाली नाही पाहिजे, त्यांनी हिमाचल प्रदेशात जावं. कारण त्यांना इथल्या पोलिसांवर, सरकारवर विश्वास नाही. चित्रपटसृष्टीत कधीच जातीयवाद पाहायला मिळाला नाही. पण कंगना ते पसरवू इच्छिते. अशा लोकांनी असे बेजबाबदार वक्तव्य नाही केलं पाहिजे. अन्यथा त्यांच्यावर एखादा व्यक्ती हल्ला करू शकतो. तिने माफी मागायला हवी.”

आणखी वाचा : रियाने एनसीबीच्या चौकशीदरम्यान उघड केली बॉलिवूडमधली मोठी नावं

कंगनाच्या मुंबईवरील वक्तव्यावरून सोशल मीडियावर अनेकांनी तिच्यावर टीका केली. याच पार्श्वभूमीवर कंगना येत्या ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्याच ट्विटरवर खडाजंगी पाहायला मिळाली. कंगनाने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी राऊतांनीही केली आहे.