अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांनी अनेकदा विविध व्यक्तींच्या माध्यमातून चरस, गांजा हे अमली पदार्थ मागवल्याची आणि विकत घेतल्याची कबुली अटक आरोपी दीपेश सावंत याने दिल्याचे एनसीबीने न्यायालयाला सांगितले. दीपेशने दिलेल्या माहितीच्या आधारे रविवारी एनसीबीने रियाकडे चौकशी सुरू केली. रविवारी तब्बल सहा तासांहून अधिक वेळ रियाची चौकशी झाली. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, या चौकशीदरम्यान रियाने बॉलिवूडमधल्या काही बड्या कलाकारांची नावं एनसीबीसमोर उघड केली. ही कोणकोणती नावं आहेत आणि कशासंदर्भात तिने ती नावं सांगितली, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही.

रियाने याआधी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये अमली पदार्थांची चव कधीच चाखलेली नाही, असा दावा केला होता. २८ ऑगस्टला तपासासाठी मुंबईत आलेल्या एनसीबीच्या विशेष पथकाने १० दिवसांत शोविक, मिरांडा, दीपेशसह आठ आरोपींना अटक करून अमली पदार्थ, रोकड आणि परकीय चलन हस्तगत केले.

रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार असल्याची माहिती तिचे वकील सतीश मानशिंदे यांनी दिली. प्रेम करणे गुन्हा असेल तर या गुन्ह्यासाठी कोणतेही परिणाम भोगण्यास रिया तयार आहे. निर्दोष असल्याने तिने अटक टाळण्याचा प्रयत्न केलेला नाही. ती अटकेसही सज्ज आहे, असं ते म्हणाले.