पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हा गुन्हा दाखल केला असून, चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा झाल्यानंतर भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डर म्हणून सेवेत होते. १९९७ मध्ये तक्रारदार व्यक्तीच्या भावाचा स्पाइनल कॉडच्या शस्त्रक्रियेदरम्यान गांधी रुग्णालयात मृत्यू झाला होता. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला होता. त्यामुळे तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली होती. त्यानंतर तक्रारदाराने राष्ट्रीय ग्राहक निवारण कक्षाकडेही तक्रार केली होती. वैद्यकीय नोंदी ठेवणारे किशोर वाघ यांनी १५ लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि तक्रारदाराच्या भावाच्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून अर्ज करण्याची सूचना तक्रारादारास केली होती. त्यासाठी वाघ यांनी चार लाखांची लाचही मागितली होती, असा आरोप तक्रारदाराने केला होता. तशी तक्रारही त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर एसीबीने सापळा रचून ५ जुलै २०१६ रोजी किशोर वाघ यांना अटक करण्यात होती. त्यानंतर त्यांना १२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. त्यानंतर एसीबीकडून १ डिसेंबर २००६ ते जुलै २०१६ दरम्यान वाघ यांच्याकडे असलेल्या उत्पन्नाचा तपास करण्यात आला होता. या तपासात त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली होती. त्यांच्या उत्पन्नापेक्षा ९० टक्के अधिक ही रक्कम होती. त्यानंतर एसीबीने १२ फेब्रुवारी रोजी किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.