महानगरपालिकेच्या प्रभाग १० अ मधील पोटनिवडणुकीसाठी उद्यापासून (शुक्रवार) उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. शहरात निवडणुकीत प्रथमच ऑनलाइन पद्धत वापरण्यात येणार असून याच पद्धतीने हे अर्ज दाखल करावे लागतील. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपाचे उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
शहरातील गोविंदपुरा-मुकुंदनगर भागातील या प्रभागात दि. १४ जूनला पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका विजया अजय दिघे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. हा प्रभाग महिला राखीव आहे. या पोटनिवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. दि. २९ पर्यंत ही मुदत आहे. दि. ३० ला अर्जाची छाननी होणार असून दि. १ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. दि. १६ ला मतमोजणी आहे. गेल्या शनिवारपासूनच या निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यासाठी उपजिल्हाधिकारी गोपाल दानेज यांची या कक्षाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बेहेरे यांनी सांगितले, की राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरावा लागेल. आधी नोंदणी करावी लागेल, ती झाली की मिळालेला युजर आयडी व पासवर्डनुसारwww.panchayatelection.maharashtra@gov.inया साईटवर उमेदवारी अर्ज दाखल करावा लागेल. नंतर त्याची प्रिंट काढून त्यावर सही करून ती निवडणूक कार्यालयात दाखल करावी लागणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननीही ऑनलाइन होणार आहे.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accept applications online from today
First published on: 22-05-2015 at 03:00 IST