मुंबईहून फलटणमार्गे म्हसवडकडे जाणाऱ्या खासगी बसला अपघात झाला असून यामध्ये ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. फलटणजवळ बाणगंगा नदीच्या पुलावर शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बस पुलाचा कठडा तोडून पुढे गेली आणि अडकली.

सुत्रांच्या माहितीनुसार, मुंबईहून-म्हसवडकडे जाणारी बस फलटणजवळ आलेली असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास बाणगंगा नदीच्या बारामती पुलावरुन जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस पुलाचा कठडा तोडून पुलामध्ये अडकून पडली सुदैवानं ती पुलावरुन नदीच्या पात्रात कोसळली नाही, त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधून प्रवास करणारे ३३ प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.

पहाटे साखर झोपेत असतानाच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे सर्व प्रवासी घाबरले होते. दरम्यान, बस चालक भानुदास सावंत यांनी नियंत्रण मिळवत बस थांबविली. बस पुढे गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता. ही घटना घडल्यानंतर या पुलावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फलटण शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बसमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. यातील जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना दुसऱ्या बसमधून म्हसवडकडे रवाना करण्यात आले. फलटण शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.