जळगाव जिल्ह्यातील पाळधी फाट्याजवळ महामार्गावर रविवारी दुपारी झालेल्या अपघातात सामाजिक कार्यकर्त्या प्रा. स्नेहजा प्रेमानंद रुपवते (वय ६५) यांचा मृत्यू झाला आहे. याच अपघातात अन्य एक जण ठार झाला असून सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये स्नेहजा रुपवते यांच्या कन्या महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस उत्कर्षा रुपवते व बंधमुक्ता यांचाही समावेश आहे.

स्नेहजा रुपवते या राज्याचे माजी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या कन्या तर माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या स्नुषा होत. त्यांचे बंधू रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मुलीचे शनिवारी लग्न होते. लग्नासाठी स्नेहजा रुपवते आपल्या दोन मुली, जावई व नातवंडे यांच्यासह खिरोदा येथे आल्या होत्या. भाचीचे लग्न आटोपल्यानंतर आज त्या आपल्या नातेवाइकांसह मुंबईकडे कारने जात होत्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास गाडीचा टायर फुटल्याने गाडीने तीन चार पलट्या घेतल्या. तसेच, या गाडीची एका दुचाकीलाही धडक बसली. या अपघातात स्नेहजा रुपवते यांचे दु:खद निधन झाले. तसेच दुचाकीवरील वासुदेव माळी हे देखील ठार झाले. अपघात झाला तेव्हा गाडीने तीन ते चार वेळा पलट्या घेतल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात स्नेहजा रुपवते यांची मुलगी उत्कर्षा (वय ३४) व उत्कर्षा यांचा मुलगा साहस (वय ४), दुसरी मुलगी बंधमुक्ता (वय ४४), त्यांची मुलगी उन्मीद तसेच जावई प्रशांत व कारचालक अश्पाक खान (वय २८) हे जखमी झाले आहेत. जखमींना जळगाव येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्नेहजा रुपवते यांचे पती काँग्रेसचे नेते प्रेमानंद रुपवते यांचे काही महिन्यांपूर्वीच दीर्घ आजारानंतर निधन झाले होते. त्यापाठोपाठ आता स्नेहजा रुपवते यांचेही अपघाती निधन झाले आहे. स्नेहजा रुपवते या महर्षी दयानंद महाविद्यालय, वडाळा, मुंबई येथे मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. बांद्रा येथील चेतना इन्स्टिट्यूटच्या त्या संचालिका होत्या. मुंबई तसेच नगर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये त्या कार्यरत होत्या. कुसुमताई चौधरी महिला कल्याणी संस्थेच्या त्या अध्यक्षा होत्या. जळगाव येथे सन २००५ मध्ये या संस्थेच्यावतीने राज्यव्यापी महिला कवयित्री संमेलन (कु सुमांजली) आयोजित करण्यात आले होते. नंतर नगर, कोल्हापूर, औरंगाबाद येथेही अशी संमेलने आयोजित करण्यात आली होती.

स्नेहजा रुपवते यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अकोल्यात पोचताच अनेकांना धक्का बसला आहे. रुपवते कुटुंबीय मूळ अकोल्याचे रहिवासी आहे. अलीकडे त्यांचे बऱ्याच वेळा अकोले येथे वास्तव्य असे. मागील महिन्यात भंडारदरा येथे झालेल्या धम्मयात्रेत त्यांचा सक्रीय सहभाग होता. प्रेमानंद रुपवते यांच्या निधनानंतर झालेली ही पहिलीच धम्म यात्रा होती. चार दिवसांपूर्वीच आपल्या नातवाला घेऊन त्यांना प्रवरा नदीवर फेरफटका मारताना अनेकांनी पाहिले होते. या गावाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे निधनाबद्दल अकोले, संगमनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर १४ मे रोजी सकाळी १० वाजता खिरोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून कळते.