सावंतवाडी न्यायालयात हजर करून तुरुंगात घेऊन जाताना संशयित आरोपी नंदकिशोर बाबुराव सावंत (३२) रा. कुडाळ याने मोती तलावात उडी घेतल्याने तो बुडाल्याचा संशय आहे. मात्र त्याचा मोती तलावात शोध घेतल्यावर सहा तासानंतर देह सापडला. कुडाळ तालुक्यात या संशयित नंदकिशोर सावंत याने वडिलांना मारहाण केल्याने तो अटकेत होता. त्याला ओरोस पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण व हवालदार ज्ञानेश्वर गवस यांनी न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याला घेऊन मोती तलावाच्या काठावरून तुरुंगाकडे चालत जाताना संशयिताने मोती तलावात उडी घेतली. त्याला वाचविण्यासाठी पोलिसांनीदेखील उडी घेतली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या संशयिताला पोलिसांनी बुडताना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसानाच बुडविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. हा प्रकार दुपारी घडला. त्यानंतर या दोघा पोलिसांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आपत्कालीन यंत्रणेचा अभाव या ठिकाणी उघड झाला. सावंतवाडी शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मोती तलावात बुडणाऱ्या वाचविण्यासाठी किंवा शोधण्यासाठी आपत्कालीन यंत्रणेकडे मनुष्यबळ नव्हते. शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बाबल आल्मेडा टीमला पाचारण करण्यात आले. या टीमच्या सात सदस्यांचे दोन तासानंतर आगमन झाले. त्यांनी शोध घेतला पण बुडणारा संशयित बेपत्ताच होता. या संशयिताला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. मोती तलावाच्या काठावरून भर दुपारी चालत जाणाऱ्या संशयित नंदकिशोर सावंत याने पोलिसांना गुंगारा देत तलावात उडी घेतल्याने धांदल उडाली. तलावाकाठी बघ्यांची गर्दी जमली पण बुडालेला मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत बेपत्ताच होता. या प्रकरणी दोघाही पोलिसांवर कारवाई होण्याचे संकेत पोलीस यंत्रणेने दिले. मोती तलावात तब्बल सहा तासानंतर तो सापडला. या घटनेमुळे पोलीस चक्रावले तर आपत्कालीन यंत्रणेचे पितळ उघडे पडले.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2016 रोजी प्रकाशित
मोती तलावात उडी मारून संशयित आरोपी बेपत्ता
शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बाबल आल्मेडा टीमला पाचारण करण्यात आले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 07-05-2016 at 01:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused missing from moti talao sawantwadi