स्वातंत्र्यपूर्वकाळापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या व कराड नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या माजी सभापती सभापती मंदाकिनी श्रीपाद देशपांडे (वय ९३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आमदार बाळासाहेब पाटील, शिक्षण मंडळ संस्थेचे मुकुंदराव कुलकर्णी, रोटरी क्लबचे दत्ता भट यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कराड पालिकेचे १९४७ ते ७४ असे तब्बल २७ वष्रे मुख्याधिकारी राहिलेले (कै) अप्पासाहेब देशपांडे यांच्या पत्नी असलेल्या मंदाकिनीबाईंनी दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण व त्यांच्या पत्नी वेणुताई यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली संरक्षण मंत्रालयाला सहकार्याच्या भूमिकेतून सामाजिक कार्य साधले. यशवंतरावांच्या पुढाकाराने व ते संरक्षणमंत्री असताना, सन १९६२ च्या युद्धानंतर स्थापन झालेल्या सैनिक सुखसाधन समितीच्या अध्यक्षा म्हणून मंदाकिनी देशपांडे यांनी काम पाहिले. जखमी सैनिक व शहिदांच्या कुटुंबीयांच्या अडचणी व गरजा यांचा अहवाल संरक्षण मंत्रालयाला त्यांनी सादर केला. कोयनेच्या १९६७ च्या भूकंपात पुनर्वसन मदतकार्यात त्या आघाडीवर होत्या.  
१९७४ ते ८० या कालावधीत त्या कराड पालिकेच्या सदस्या होत्या. १९७८ ते ८६ या कालावधीत त्यांनी कराड नगरपरिषदेच्या उपसभापती व सभापती पदाची धुरा संभाळली. या दरम्यान, त्या पश्चिम महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीवर निवडल्या गेल्या. येथील प्रतिष्ठित शिवाजी हाउसिंग सोसायटीच्या त्या प्रवर्तक होत्या. कोयना सहकारी सिमेंट वस्तू निर्मितीसंस्थेच्या संचालिका, तालुका स्वस्त धान्यवाटप समितीच्या व कराड कुटीर रुग्णालयाच्या सल्लागार म्हणून मंदाकिनीबाई देशपांडे यांनी काम पाहिले.