सतीश कामत

रत्नागिरी : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर राहिलेले कोकणातील आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक यांच्या मालमत्तेची चौकशी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता या दोघांशी संबंधित राजकीय कार्यकर्त्यांनाही लक्ष्य केले आहे. साळवी यांचे स्वीय साहाय्यक सुभाष मालप, तर बांधकाम व्यवसाय असलेल्या आमदार नाईक यांच्याकडून फ्लॅट विकत घेतलेल्या नागरिकांनासुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 विधानसभा निवडणुकीत कोकणातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधून निवडून आलेल्या शिवसेनेच्या सहा आमदारांपैकी योगेश कदम, उदय सामंत आणि दीपक केसरकर हे तिघेजण शिंदे गटामध्ये सहभागी झाले आहेत. पण भास्कर जाधव, राजन साळवी आणि वैभव नाईक हे तीन आमदार अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. त्यातही साळवी आणि नाईक यांची ताकद लक्षात घेऊन त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही महिन्यांत या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे नोटिसा पाठवून त्यांची दोन वेळा चौकशी करण्यात आली. नाईक यांचा बांधकाम व्यवसाय असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून सदनिका खरेदी केलेल्या सामान्य नागरिकांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटिसा पाठवल्या असल्याची माहिती स्वत: नाईक यांनी लोकसत्ताह्णला दिली. त्याचबरोबर त्यांच्या आमदार निधीतून आर्थिक साहाय्य मिळालेल्या सरपंचांनाही नोटीस बजावून गेल्या सोमवारी रत्नागिरीतील कार्यालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. आमदार नाईक यांच्या निधीतून झालेल्या कामांच्या आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, अशा आशयाची ही नोटीस आहे. ग्रामपंचायतींच्या सरपंचांना नोटीस बजावण्याची ही कोकणातील पहिलीच वेळ आहे. पण त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास नकार देऊन ओरोस येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातच ही चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.