सिंधुदुर्गातील ओरोसमध्ये अभिनेते गिरीश ओक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचे समोर आले आहे. अभिनेते गिरीश ओक हे नाटकाच्या प्रयोगासाठी ओरोस येथे गेले होते. त्यावेळी ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. पण, मंगळवारी रात्री शासकीय विश्रामगृहातून त्यांचं सामान विनापरवानगी बाहेर फेकून देण्यात आलं. या अपमानास्पद वागणुकीबद्दल गिरीश ओक यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता मराठी कलाविश्वातूनही याचा निषेध केला जात आहे.
गिरीश ओक तुझे आहे तुजपाशी या आपल्या नाटकाच्या प्रयोगासाठी सिंधुदुर्गमधील ओरोसमध्ये दाखल झाले होते. यावेळी राहाण्यासाठी शासकीय विश्रामगृहाचा पर्याय त्यांनी निवडला. रात्री नियोजित प्रयोगासाठी ते बाहेर निघून गेले. रात्री विश्रामगृहावर आल्यावर त्यांना सामान बाहेर फेकून देण्यात आल्याचे दिसले. यावेळी इतक्या रात्री आम्ही कुठे जायचे? असा प्रश्न गिरीश ओक यांनी केला असता, कर्मचाऱ्यांनी त्यावर हतबलता व्यक्त केली. तुम्ही केवळ एक दिवसाकरिता येथे येता. मात्र, आम्हाला अधिकाऱ्यांना नेहमी उत्तर द्यावे लागते, असे त्यांना सांगण्यात आले. या साऱ्या प्रकारानंतर गिरीश ओक यांनी मिळालेल्या वागणुकीवर एक व्हिडीओ टाकला आहे. यात त्यांनी शासकीय विश्रामगृहावर नाराजी व्यक्त केली. या व्हिडिओनंतर दिग्दर्शक रवी जाधव, मिलिंद कवडे, आरोह वेलणकर यांसह काही जणांनी नाराजी व्यक्त केली आहे.
‘तुझे आहे तुजपाशी’च्या कलाकारांना ऐन मध्यरात्री रस्त्यावर आणणा-या सिंधुदुर्गच्या सीईओंचा मी व्यक्तीश: जाहीर निषेध… https://t.co/fxQCEEooU2
— Ravi Jadhav (@meranamravi) February 2, 2017
Horrible behavior by these authorities, high time we expose them. Strict action must be taken. https://t.co/j0lFxdUOsi
— Aroh Welankar (@ArohWelankar) February 2, 2017
दरम्यान, या निषेधासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट श्रीनिवास नार्वेकर यांनी लिहीली आहे. या पोस्टमध्ये लिहिलेय की, ‘तुझे आहे तुजपाशी च्या कलाकारांना ऐन मध्यरात्री रस्त्यावर आणणा-या सिंधुदुर्गच्या सीईओंचा मी व्यक्तीश: जाहीर निषेध करतोय….! आत्ताच सर्फींग करत असताना एक उद्वेगजनक बातमी समोर आली आणि प्रचंड संताप आला. तुझे आहे तुजपाशी नाटकाच्या कोंकण दौ-यावर असलेले डॉ. गिरीश ओक, रवि पटवर्धन, या नाटकातील कलाकार आणि आगामी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर, विद्यमान अध्यक्ष गंगाराम गवाणकर आदींसह नाटकातल्या महिला कलाकारांचं सामान ऐन मध्यरात्री रेस्ट हाऊसबाहेर काढलं. सिंधुदुर्गच्या सीईओंनी आपल्या नातेवाईकांना रेस्ट हाऊसमध्ये जागा मिळवून देण्यासाठी हे कृत्य केल्याचं बोललं जातंय. हे अत्यंत लांच्छनास्पद आहे. नालायकपणाचा कळस आहे हा. डॉ. गिरीश ओक जिल्हाधिकार्यांशी फोनवर बोलतानाचा व्हिडीओदेखील आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी ज्या पध्दतीनं सरकारी भाषेत बोलताना ऐकू येतंय, तेसुध्दा खरोखर लाजिरवाणंच. शेखर सिंह यांनी आपल्या नातेवाईकांसाठी केलेला हा उद्दामपणा नक्कीच संतापजनक आहे.’