Actress Tejaswini Pandit Video : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या मुद्यांवरून गेल्या काही दिवासांपासून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान विरोधकांकडून होत असलेला विरोध पाहाता राज्य सरकारने हे दोन्ही आदेश रद्द केले. यानंतर या विजयाचा जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यांच्यावतीने आज (५ जुलै) मुंबईत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले. मुंबईच्या वरळीतील डोम या ठिकाणी ठाकरे बंधूंचा हा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधूं अनेक वर्षांनंतर एका व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिलाले. या मेळाव्याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं.
या मेळाव्याला वेगवेगळ्या पक्षांचे नेते याबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. मराठी चित्रपट अभिनेत्री तेजस्विनी पंडितने देखील या मेळाव्याला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. “आम्ही इथे मराठीसाठी आलो आहोत, मराठीचा जो विजय झाला आहे तो साजरा करण्यासाठी आलो आहोत,” असे तेजस्विनी मेळाव्यात सहभागी होण्यापूर्वी म्हणाली. “महाराष्ट्रात जी गोष्ट, जे दृष्य पाहायला आम्ही वर्षानुवर्ष आसुसलो होतो, ते दृष्य आज आम्हाला मंचावरती दिसणार आहे,” असेही ती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबद्दल बोलताना म्हणाली.
मराठी कलाकार का सहभागी होत नाहीत?
मराठी सिनेमांच्या संदर्भात जेव्हा समस्या असतात तेव्हा अनेक कलावंत हे राज ठाकरे यांना भेटायला येतात, पण जेव्हा मराठीचा विषय असतो किंवा पक्ष आवाहन करतो तेव्हा मोठ्या संख्येने मराठी कलाकार का सहभागी होत नाहीत? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी तेजस्विनीला विचारला. याला उत्तर देताना तेजस्विनी म्हणाली की, “मी माझ्यापुरतं बोलू शकते, मला पण हा प्रश्न पडला आहे की, असं का होत नाही. इतर वेळेला जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो आणि जेव्हा मराठीचा प्रश्न येतो तेव्हा मग का येत नाहीत, हे दुर्दैवी आहे. कलावंत म्हणून मला देखील प्रश्न आहे. पण मी स्वत:विषयी बोलू शकते, मी इथं आलीय हेच उत्तर आहे.”
राज ठाकरेंनी मानले मोजक्या कलाकारांचे आभार
मेळावा संपल्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मेळाव्यातील भाषणात राहुन गेलेल्या लोकांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी या पोस्टमध्ये काही मोजक्या कलाकारांचेही आभार मानले आहेत.
“हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो,” असे राज ठाकरे म्हणाले आहेत.